Ticker

6/recent/ticker-posts

जिजाऊ स्मारकासाठी संभाजी ब्रिगेडचे सोलापुरात निदर्शने


सोलापूर : सोलापूर शहरात राष्ट्रमाता जिजाऊ यांचे स्मृतिस्थळ किंवा भव्य स्मारक उभारण्यात यावे, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने चार हुतात्मा चौक येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी “राष्ट्रमाता जिजाऊंचा विजय असो”, “जय जिजाऊ जय शिवराय”, “तुमचं आमचं नातं काय - जय जिजाऊ जय शिवराय” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला.

संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की,सोलापूर शहरात राष्ट्रमाता जिजाऊ यांचा पुतळा किंवा स्मारक नसल्यामुळे विविध जयंती-पुण्यतिथी आणि कार्यक्रमांच्या वेळी शिवभक्तांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे चार हुतात्मा चौक परिसरात राष्ट्रमाता जिजाऊ यांचे स्मृतिस्थळ किंवा स्मारक उभारण्याची मागणी करण्यात येत आहे.


या संदर्भात यापूर्वी सोलापूरचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील,सध्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे,आमदार देवेंद्र कोठे तसेच सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र प्रशासनाकडून या मागणीची अद्याप दखल घेतली नसल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे प्रशासनाच्या निषेधार्थ चार हुतात्मा चौक येथे आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी भाजपचे पालकमंत्री आणि आमदार मराठा समाजाच्या विविध मागण्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला.






या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले,श्याम कदम,सतीश शिरसाट,मंगल सिंह ठाकूर,रमण शिवशेट्टी,जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले,उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष विक्रम वानकर,जिल्हा संघटक दिलीप भोसले, उद्योग आघाडी शहराध्यक्ष संतोष सुरवसे,जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बाबर,जिल्हा सचिव राजेंद्र माने,प्रशांत देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.