बाकीचे वाऱ्यावर.......
सोलापूर : पत्रकाररांच्या गृह प्रकल्पाला वेग आला आहे. सोलापुरातील अनेक पत्रकार हे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी धावपळ करत आहेत. मात्र ज्यांच्याकडे अधिस्वीकृती कार्ड आहे, त्यांचे अर्ज पात्र होतील,बाकीचे अर्ज केराच्या टोपलीत टाकले जाणार आहे. पत्रकार संघटनेचे तथाकथित अध्यक्ष हे अनेक वर्षापासून पत्रकाराच्या घरकुल योजनेवर दिशाभूल करत आहेत. संघटनेच्या कार्यालयात बसून पत्रकारांना घरांचं स्वप्नं दाखवणाऱ्याना देखील नियम व अटी माहीत आहेत,तरीही म्हणेल त्याला घरकुलचे अर्ज भरा असे खोटे आश्वासन दिले जात आहे. शासनाने दिलेल्या अधिस्वीकृती धारक पत्रकारांनाच ही घरे मिळणार आहेत,हे कळून चुकले आहे.
शासनाच्या नियम व अटी काय आहेत....? - सोलापूर शहरातील पत्रकारांना कायमस्वरूपी निवासाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पत्रकारांसाठी विशेष निवास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शासकीय खर्चातून निवासी इमारती उभारून पात्र पत्रकारांना घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पात्रता निकष व नियमावली निश्चित करण्यात आली असून शहरातील ठराविक संख्येतील पत्रकारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सोलापुरात जवळपास १२० ते १२५ पत्रकार अधिस्वीकृती धारक आहेत. या योजनेचा उद्देश पत्रकारांना स्थिर निवास सुविधा उपलब्ध करून देणे आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात दीर्घकाळ काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन देणे हा आहे.
पात्रतेसाठी महत्त्वाचे निकष - पत्रकारांना निवास मिळण्यासाठी शासनाने काही अटी व निकष निश्चित केले आहेत. त्यामध्ये पुढील बाबींचा समावेश करण्यात आला आहे. अर्जदार पत्रकार हा मान्यताप्राप्त (अॅक्रेडिटेड) पत्रकार असणे आवश्यक. संबंधित पत्रकाराने ठराविक वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात सातत्याने काम केलेले असणेआवश्यक आहे. अर्जदाराच्या नावावर सोलापूर शहर किंवा परिसरात स्वतःचे घर नसावे. पत्रकाराने शासकीय नियमांनुसार आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक. अर्जदार हा सोलापूर शहरात वास्तव्यास असणे आवश्यक.
अर्ज प्रक्रिया - पत्रकारांना या योजनेसाठी ठराविक कालावधीत अर्ज करावा लागणार आहे. अर्जासोबत पत्रकारिता करणाऱ्या संस्थेचे प्रमाणपत्र,मान्यता पत्र, ओळखपत्र तसेच इतर आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक राहणार आहे. प्राप्त अर्जांची छाननी समितीद्वारे करण्यात येणार असून पात्र पत्रकारांची अंतिम यादी तयार केली जाईल.
