सोलापूर : मोहोळ तालुक्यातील महसूल प्रशासनात खळबळ उडवणाऱ्या लाच प्रकरणात अँटी करप्शन ब्युरोने (ACB) तपासाची व्याप्ती वाढवली असून, मोहोळच्या तहसीलदारांना १ एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. वाफळे येथील तलाठीने वरिष्ठांचे नाव सांगून ट्रॅक्टर मालकाकडून लाच घेतल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,मुरूम वाहतूक करताना पकडण्यात आलेल्या तीन ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी संबंधित तलाठीने ठराविक रकमेची मागणी केली होती. या प्रकरणात वाफळेचे तलाठी सुदर्शन रमेश जाधव यांना अँटी करप्शन ब्युरोने सापळा रचून रंगेहात पकडले. सुरुवातीला ३३ हजार रुपयांच्या व्यवहारात २३ हजार रुपये स्वीकारल्याची कबुली देण्यात आली होती, तर उर्वरित १० हजार रुपये स्वतःसह वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी असल्याचे सांगून मागितले गेले होते. सापळा कारवाईदरम्यान ही उर्वरित रक्कम स्वीकारताना जाधव यांना पकडण्यात आले.
या प्रकरणी माढा पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत कलम ७ व ७अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून,आरोपी तलाठीला अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान “वरिष्ठांचे नाव” पुढे करून लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने तपासाचा फोकस आता उच्चस्तरीय जबाबदारीवर केंद्रित झाला आहे.
या पार्श्वभूमीवर अँटी करप्शन ब्युरो चे उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांनी मोहोळ तहसीलदारांना नोटीस बजावत १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सोलापूर येथील ACB कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित प्रकरणाशी निगडित सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान,या घटनेमुळे महसूल विभागातील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, “वरिष्ठांचे नाव” वापरून लाच मागितली गेली असल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. तपासात पुढे आणखी कोणती नावे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिरापूर परिसरातील मुरूम उत्खननावरही संशय
या प्रकरणाच्या अनुषंगाने मोहोळ तालुक्यातील शिरापूर (सो) गावातील लांबोटी विक्री परिसरात,उजनी कालव्याच्या मायनर क्रमांक ४ च्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खनन सुरू असल्याची बाबही समोर येत आहे.
स्थानिकांकडून याबाबत गंभीर आरोप करण्यात येत आहेत.
उजनी कालव्यालगत सुरू असलेले हे उत्खनन नेमके कोणाच्या परवानगीने चालू आहे,याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पाटबंधारे विभाग,महसूल विभाग किंवा स्थानिक राजकीय हस्तक्षेपामुळे हे काम सुरू आहे का,असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून,संबंधित विभागांनी संयुक्तपणे कारवाई करावी,अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. जर अनधिकृत उत्खनन सिद्ध झाले, तर पर्यावरणीय आणि शासकीय नुकसानीच्या दृष्टीनेही हे प्रकरण गंभीर मानले जात आहे.
पुढील तपासाकडे लक्ष मोहोळ तहसीलदारांची चौकशी, तलाठी प्रकरणातील पुढील तपास आणि शिरापूर परिसरातील मुरूम उत्खनन या तिन्ही बाबी आता एकमेकांशी संबंधित आहेत का,याचा तपास ACB कडून केला जाण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
