मुंबई : नरिमन पॉईंट येथील प्रदेश कार्यालयात अनुसूचित जमाती मोर्चाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या सूचनेनुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीच्या प्रारंभी नागपूर येथील आदिवासी समाजातील राज्यसभा खासदार म्हणून नियुक्त झालेल्या माया इनवते तसेच अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवराज होली यांचा प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या हस्ते शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यानंतर झालेल्या बैठकीत आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या योजनांची अंमलबजावणी कशी करावी याबाबत मंत्री अशोक उईके यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
बैठकीदरम्यान विविध पदाधिकाऱ्यांनी आदिवासी समाजाला जात प्रमाणपत्र,रेशन कार्ड,रहिवासी दाखले यांसारख्या मूलभूत कागदपत्रांच्या अभावामुळे शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत असल्याची समस्या मांडली. यावर तालुका व जिल्हा स्तरावर विशेष प्रयत्न करून सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात येईल,असे आश्वासन मंत्री उईके यांनी दिले.
तसेच आदिवासी पारधी समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. या उपक्रमात मुख्यमंत्री फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चव्हाण आणि मंत्री उईके स्वतः लक्ष घालत असल्याचे नमूद करण्यात आले. यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना आर्थिक बळ मिळून ते मुख्य प्रवाहात येतील,असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी व्यक्त केला.
नव्याने राज्यसभा खासदार झालेल्या माया इनवते यांनी आपल्या भावना व्यक्त करताना,पक्षाशी एकनिष्ठ राहून केलेल्या कामाची दखल घेतल्याबद्दल नेतृत्वाचे आभार मानले. त्यांच्या भाषणावेळी “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम्”च्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले. या बैठकीत हरिश्चंद्र भोई,प्रदेश संयोजक किशोर काळकर, एस.टी.मोर्चा महामंत्री सुदर्शन शिंदे यांसह विविध मान्यवरांची प्रेरणादायी भाषणे झाली.
यावेळी एस.टी.मोर्चा उपाध्यक्ष कोमल चव्हाण,प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते अनिल भिमराव चव्हाण,पुण्याच्या नगरसेविका राजश्री काळे,सचिव नकुल चव्हाण,ज्ञानेश्वर भोसले,ॲड.सुरेश काळे,उद्धव भोसले,देविदास काळे,शिवा काळे (मुंबई), रमेश पवार,सचिन काळे,शीतल काळे,बायती काळे यांच्यासह राज्यभरातील मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
