Ticker

6/recent/ticker-posts

लिंगायत स्मशानभूमीच्या वादामध्ये समाजाच्या दोन्ही संस्था व समाजाला वेठीस धरू नये - विजयकुमार हत्तुरे प्रदेश कार्याध्यक्ष,जागतिक लिंगायत समाज महासभा


सोलापूर : सोलापूर शहरातील लिंगायत समाजाच्या जिव्हाळ्याचा आणि अत्यंत संवेदनशील प्रश्न म्हणजे स्मशानभूमीचा प्रश्न आहे. अक्कलकोट रोड लगत असलेली जागा सोलापूर महानगरपालिकेने लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी देण्याचा प्रस्ताव महापालिकेत आणला होता. समाजाच्या दृष्टीने हा निर्णय स्वागतार्ह असला तरी, त्या स्मशानभूमीची देखभाल सिद्धेश्वर देवस्थान समितीकडे द्यावी की होटगी मठाकडे,यावरून अनावश्यक वाद आणि टीका सुरू झाली आहे.





या विषयामध्ये सध्या अतिशय घाणेरडे राजकारण होत असल्याचे दिसून येत आहे. काही मंडळी केवळ श्रेयवादासाठी आणि राजकीय पोळी भाजण्यासाठी मंदिर समिती आणि मठ यांच्यामध्ये मुद्दाम वाद निर्माण करत आहेत. हा प्रकार समाजहिताला घातक असून,यामुळे संपूर्ण लिंगायत समाज बदनाम करण्याचे कटकारस्थान रचले जात असल्याची भावना समाजामध्ये निर्माण होत आहे. लिंगायत समाजाच्या भावना लक्षात घेता,सिद्धेश्वर मंदिर समिती आणि होटगी मठ या दोन्ही संस्था समाजाच्या श्रद्धेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे कोणत्याही एका संस्थेला लक्ष्य करून दुसऱ्या संस्थेविरोधात वातावरण निर्माण करणे चुकीचे आहे. समाजाच्या दोन्ही संस्थांमध्ये संघर्ष निर्माण करून संपूर्ण समाजाला वेठीस धरणे कोणालाही मान्य होणार नाही.


सोलापूर महानगरपालिकेने या प्रश्नाकडे कोल्हापूरच्या धर्तीवर सर्वसमावेशक धोरणात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. शहरातील सर्व स्मशानभूमी महापालिकेच्या अखत्यारीत घेऊन त्यांचे आधुनिकीकरण,स्वच्छता,पाणी, वीज,रस्ते,शेड,बसण्याची व्यवस्था,अंत्यविधीसाठी आवश्यक सुविधा अशा सर्व बाबींसह अद्ययावत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,अशी जागतिक लिंगायत महासभेची  मागणी आहे.


लोकभावना समजून घेत सोलापूर महानगरपालिकेने तातडीने निर्णय घेतला तर यामुळे केवळ समाजाचा प्रश्न सुटणार नाही, तर सोलापूर शहराच्या विकासाला आणि सामाजिक सलोख्याला नवी दिशा मिळेल. श्रेय वादापेक्षा सामाजिक विकासाला प्राधान्य द्यावे असे मत यावेळेस राजेश काळे माजी उपमहापौर यांनी व्यक्त केले.