कोषागार कार्यालय ३१ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार
सोलापूर : मार्च अखेर असल्याने शासकीय कार्यालयांमध्ये अर्थसंकल्पीय कामांना युद्धपातळीवर गती मिळाली आहे. निधीचे वितरण,मागणी व पुनर्वितरण यांसारख्या कामांसाठी अधिकारी-कर्मचारी सुट्टीच्या दिवशीही कार्यालयात उपस्थित राहून रात्री उशिरापर्यंत कार्यरत असल्याचे चित्र दिसून आले.
२८ व २९ मार्च शनिवार-रविवारी तसेच ३१ मार्च महावीर जयंती दिवशीही कार्यालये सुरू ठेवण्याचे निर्देश दिले होते.
या काळात जिल्ह्यातील विविध विभागाच्या विकास कामावर झालेल्या खर्चाची देयके संबंधित विभागाकडून कोषागार कार्यालयात दाखल केल्यानंतर विहित नियमावली प्रमाणे मंजूर करणे व निधी संबंधिताच्या खात्यावर वर्ग करणे तसेच
विविध विभागाच्या योजना व आवश्यक अनुदानाची मागणी कामे सुरू होती.
जिल्हा कोषागार कार्यालय रविवारी दिवसभर सुरू राहिले असून ३१ मार्च रोजी उशिरापर्यंत कामकाज सुरू राहणार असल्याचे जिल्हा कोषागार अधिकारी वैभव राऊत यांनी सांगितले.
