Ticker

6/recent/ticker-posts

रमजानुल मुबारक - ४ आणि ५ - दीन दुखितांना मदत करा, रमजान महिन्यातील केले.


रोजा - मोमीनांसाठी ढाल
रमजान महिना हा रोजा अर्थात उपवासासाठी प्रसिद्ध आहे.महिनाभराचे रोजे फर्ज आहेत.कोणत्याही कारणास्तव त्यात सूट नाही. प्रत्येक सज्ञान स्त्री-पुरुषांनी ते केले पाहिजे.रोजे किंवा उपवास म्हणजे केवळ उपाशी राहणे नव्हे तर शरीराशी निगडित प्रत्येक बाबीशी रोजाचा निकटचा संबंध आहे.सकाळपासून संध्याकाळपर्यंत न खाता-पिता उपाशी राहिला म्हणून त्याचा रोजा झाला असे अजिबात नाही.


रोजा प्रत्येक वाईट गोष्टींपासून थांबविण्याचे काम करतो.व्यक्तीच्या प्रत्येक अंगाशी तो निगडित आहे. रोजाचा मुख्य उद्देश खोटे बोलणे आणि द्वेष या पासून दूर ठेवणे हा आहे.रोजा ठेवून जर कोणी व्यापारी आपला व्यापार करण्यासाठी खोटं बोलत असेल,वस्तू विकण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खोटं बोलत असेल,लोकांना फसवत असेल तर अशा व्यक्तीला रोजा ठेवण्याची गरज नाही. तसेच जर कोणी एकमेकाचा द्वेष करीत असेल,कोणतेही कारण नसताना एकमेकाची बदनामी करीत असेल,नको त्या गोष्टी पसरवून समाजामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल गैरसमज निर्माण करून देत असेल,विनाकारण द्वेष करून मत्सर व्यक्त करीत असेल तर अशा लोकांचे रोजे काही कामाचे नाहीत.अशा सर्व चुकीच्या बाबी पासून परावृत्त करण्याचे कार्य रोजा करीत असतो. ज्या ज्या ठिकाणी माणसांचा माणसांशी संबंध येतो,त्या त्या ठिकाणी खोटं बोलणं वर्ज्य आहे. याची जाणीव ठेवून प्रत्येकाने वागले पाहिजे.तरच त्याच्या रोज्याला अर्थ आहे. जर या गोष्टी पासून तो परावृत्त होत नसेल तर त्याचा रोजा म्हणजे फक्त उपासमारी शिवाय दुसरे काही नाही. 

हजरत प्रेषित पैगंबर यांनी म्हटले आहे कि रोजा मोमिनासाठी ढाल आहे. लढाईमध्ये ढाल शत्रूपासून संरक्षणासाठी वापरली जाते. रोजाचा प्रमुख शत्रू शैतान आहे आणि शैतान दुष्कृत्ये करण्यासाठी सतत प्रवृत्त करीत असतो.खोटं बोलून किंवा द्वेष करून आपण त्याच्या आमिषाला बळी पडत असतो. अशा आमिषापासून रोखण्याचे कार्य रोजामध्ये होते आणि म्हणून रोजा धरल्यानंतर आपल्या कडून कोणत्याही प्रकरणात खोटेपणा होणार नाही किंवा कुणाचा द्वेष होणार नाही याची काळजी घेणे हे प्रत्येक रोजादाराचे कर्तव्य आहे.



दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रसंगी लोक खोटं बोलतात. त्यातून तात्पुरता त्यांचा हेतू साध्य होत असला तरी हे खोटं कधी न कधी उघडं पडतं म्हणून खोटं कधीही बोलू नये. व्यवहारात,वागण्यात,बोलण्यात किंवा अन्य कोणत्याही प्रकारात खोटे बोलण्यापासून दूर राहावे. कारण खोटं म्हणजे झूठ हे सर्व प्रकरणांचा मूळ आहे. एकदा खोटेपणा उघड झाला तर अशा व्यक्तीची विश्वासार्हता राहत नाही. आपला विश्वास कायम ठेवणे हे प्रत्येक व्यक्तिमत्त्वाचं कर्तव्य आहे.व्यक्तिमत्व विकासाचे साधन म्हणूनही रोजा परिचित आहे. (क्रमशः)
 सलीमखान पठाण 






 रमजानुल मुबारक - ५.   

 दीन दुखितांना मदत करा, रमजान महिन्यातील केले.
 
जाणारे प्रत्येक कार्य पुण्यप्राप्ती करुन देणारे,एकमेकांना सहाय्य करणारे,गोर गरीब,दीन दलित,अनाथ,विधवा गरजूंना मदत करणारे असते.समाजातील विविध घटकांच्या समस्यांची जाणिव रमजानच्या रोजातून होते. आपल्या आसपास जे लोक राहतात त्यापैकी काही गरीब आहेत,गरजू आहेत,कुणी आजारी आहेत,कुणाच्या घरात खायला नाही,कुणी अनाथ आहेत,बेसहारा आहेत,वृध्द आहेत अशा लोकांच्या विविध समस्या सोडविणारा कुणी नाही. अशा घटकांना सामाजिक जाणिव व माणुसकीच्या भावनेतून आपण मदत केली पाहिजे ही वृत्ती रोजामुळे निर्माण होते. भूकेची जाणिव होऊन भुकेल्या बद्दल सहानुभूती निर्माण होऊन अशा घटकांना मदत केली पाहिजे ही भावना उदयास येते.गरीबांना ही अन्न,पाणी,निवारा आवश्यक आहे,त्यांनाही कपडे दिले पाहिजे,आजारी रुग्णांना मदत केली पाहिजे अशा प्रकारच्या जाणिवा रोजामुळे कळतात व त्यातूनच मदतीचा हात पुढे येतो. हजरत पैगंबरांनी समाजातील अशा घटकांना शक्य तेवढी मदत करण्याची शिकवण दिली आहे. भौतिक सुखाच्या मागे धावतांना आज माणुसकी व नातं लोप पावत आहे. भाऊ भावाला विचारीत नाही,ज्यांनी काबाडकष्ट करुन आपल्याला मोठे केले अशा मातापित्यांना न विचारणारे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारे भरपूर लोक समाजात आहेत. 

अशा वेळी अशा घटकांना मदतीचा हात देण्याची गरज असते. रोजातून हीच भावना निर्माण होते.आपण प्रगतीची खूप शिखरं सर केली असली तरी अधोगतीच्या द-या देखील निर्माण केल्या आहेत. आई घरात मरुन पडली तरी देखील तिच्याकडे न पाहणारे किंवा अमेरिकेत मुलाला पाठविण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारा बाप जेव्हा मेला तेव्हा त्या बापाच्या अंतिम संस्कारांसाठी वेळ नसणारा मुलगा आपल्या समाजाने अनुभवला आहे. प्रगती म्हणजे नात्यांचा विसर नव्हे तर नात्यांना सांभाळून पुढे जाण्याचा मार्ग म्हणजे प्रगती. ही वैचारिक शृंखला रोजा मुळे गुंफली जाते.  व्यक्तींच्या समूहातून समाज अस्तित्वात येतो व आपले सुख दुःख हे समाजाचेही सुखदुःख असते अशा वेळी आपण मदत केली पाहिजे ही शिकवण रोजा मधून मिळत असते. 

आपल्या सारखी तहान,भूक,थकवा,ग्लानी इतरांनाही आली असेल,जे आपल्याकडं आहे ते इतरांकडे असेल का? हा प्रश्न मनात निर्माण होऊन मदतीची भावना निर्माण होते. समाजातील असे अनेक हात मदतीसाठी पुढे येतात व गरजू घटकांच्या गरजा पूर्ण होतात. प्रत्येक धर्मात अशा प्रकारची मदत करणारे हजारो हात परमेश्वराने निर्माण केले आहेत व ते आपल्या परीने मदत करीत असतात. यालाच पुण्यवान म्हणतात. रमजान महिन्याचा संदेश हाच आहे कि स्वतःसाठी जगतांना इतरांसाठी ही जगा. आपल्या कौटुंबिक गरजा पूर्ण करतांना आपल्या शेजारी परिसरात जे गोरगरीब आहेत त्यांना ही मदत करा तरच तुम्ही यशस्वी व्हाल. अन्यथा तुम्हाला येथे केलेल्या प्रत्येक कृत्याचा हिशोब कयामतच्या दिवशी दयावाच लागेल.(क्रमशः)
सलीमखान पठाण