Ticker

6/recent/ticker-posts

नगरसेवक,नातेवाइकांनी शिवी दिल्यास फौजदारी महापालिका आयुक्त यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश



छत्रपती संभाजीनगर : काही नगरसेवक,त्यांचे निकटवर्तीय काही दिवसांपासून अधिकारी, कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत बोलत आहेत. काहींनी तर शिवीगाळच केली. सफाई कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याची धमकी देतानाचे व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर टाकले. नगरसेवकांच्या वाढत्या दादागिरीला कंटाळून सोमवारी प्रशासनानेही ठोस पाऊल उचलले. यापुढे कोणीही शिवीगाळ केली,दाराला लाथ मारून कार्यालयात प्रवेश केला तर त्याच्यावर थेट फौजदारी कारवाई करण्याचे आदेश आयुक्त जी.श्रीकांत यांनी दिले.


नवनिर्वाचित नगरसेवकांना निवडून येऊन महिनाही झाला नाही,तोच त्यांनी प्रशासनावर दादागिरी करायला सुरुवात केली. वॉर्ड अधिकारी,उपअभियंता,कनिष्ठ अभियंता यांना तर अतिशय वाईट पद्धतीने वागणूक देण्यास सुरुवात केली. रस्ते,पाणी,ड्रेनेज,कचरा या चारच मुद्द्यांवर अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना नवनिर्वाचितांनी सळो की पळो करून सोडले आहे. पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांना महापालिकेच्या कामकाजाची पद्धतच माहीत नाही. 'हम करे सो कायदा' असे त्यांना वाटतेय. नगरसेविका असतील तर त्यांचे नवरोबा सर्व कामकाज पाहत आहेत. त्यांनीही मनपाच्या कामकाजात हस्तक्षेप सुरू केला. या सर्व तक्रारी रोज प्रशासकांकडे येऊ लागल्या. काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तर या छळाला कंटाळून बदली करून घेण्याची इच्छा आयुक्तांकडे व्यक्त केली.




विभागप्रमुखांकडून घेतला कामकाजाचा आढावा

१) सोमवारी आयुक्त जी.श्रीकांत यांनी सर्व विभागप्रमुखांकडून कामकाजाचा आढावा घेण्यास सुरुवात केली. त्यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचा खरपूस समाचार घेतला. यापुढे कोणीही दादागिरी करीत असेल तर त्यांच्यावर थेट ३५३ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले.

२) नगरसेवकाचा फोन अधिकाऱ्यांना उचलता आला नाही तर त्यांनी मेसेज करावे. कार्यालयात नगरसेवकांचे स्वागत करा,त्यांचे म्हणणे व्यवस्थित ऐका.

३) नगरसेवक किंवा त्यांच्या नातेवाइकाचे ऐकून विकासकाम थांबविले तर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल.

४)  नगरसेवकांच्या लेटरहेडवर कोणी औरंगाबाद,कोणी छत्रपती संभाजीनगर तर कोणी छत्रपती संभाजी नगर असे लिहीत आहे. एकसारखेपणा असण्यासाठी महापौरांसोबत चर्चा करण्यात येईल. 

असे कडक आदेश महापालिका आयुक्त जी.श्रीकांत यांच्याकडून अधिकाऱ्यांना देण्यात आले.