Ticker

6/recent/ticker-posts

स्वीकृत नगरसेवक पद १० तर प्राप्त अर्ज ६२


सोलापूर :  महानगरपालिका स्वीकृत सदस्यपदासाठी बुधवारी ६२ अर्ज दाखल झाले. यापैकी भाजपकडून 
२० हून अधिक जणांनी तर एमआयएमतर्फे ३ जणांनी उमेदवारी दाखल केले. अर्ज दाखल केलेल्यांपैकी भाजपकडून कोणाला संधी मिळणार याविषयी बुधवारी सस्पेन्स कायम होता.

महापालिका आयुक्त कार्यालयात बुधवारी ११ ते ०१: ३० या दरम्यान उमेदवारी दाखल करण्याची वेळ होती. महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्यावतीने २० हून अधिक जणांनी अर्ज दाखल केले. स्वीकृत सदस्यपदाच्या एकूण १० जागा आहेत. महापालिकेतील पक्षीय बलाबलनुसार भाजपच्या वाट्याला ०९ तर एमआयएमला ०१ जागा मिळणार आहे. 

महापालिका निवडणुकीवेळी १०२ जणांना उमेदवारी देताना भाजपने गोपनीयता बाळगली होती. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत  उमेदवारी कोणाला दिली,याचा  थांगपत्ता उमेदवारांसह कार्यकर्त्यांना लागला नव्हता,कारण उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी उमेदवारांना एबी फॉर्म न देता भाजपकडून एकगठ्ठा एबी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आले. बंडखोरी व नाराजी टाळण्यासाठी भाजपकडून एकगठ्ठा एबी फॉर्म देण्याची खेळी करण्यात आली होती.



या पार्श्वभूमीवर स्वीकृत सदस्यपदाबाबतदेखील भाजपने बुधवारी सस्पेन्स कायम ठेवला. कारण या पदासाठी भाजपकडे सुमारे ४०० हून अधिक जणांचे अर्ज आले आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी ०९ जागांसाठी भाजपकडून २० हून अधिक जणांनी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा क्षणापर्यंत  राजकीय हालचाली दिसून आल्या. नाराजीनाट्य टाळण्यासाठी भाजपने बुधवारी अंतिम उमेदवारांची घोषणा केली नाही,हे विशेष.
 पालकमंत्री जयकुमार गोरे,भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर,भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख,सुभाष देशमुख,देवेंद्र कोठे यांनी सुचवलेल्या नावांच्या स्वीकृत सदस्यपदाबाबत विचार होणार आहे. यामध्ये कोणाच्या वाट्याला किती जागा मिळणार,याविषयी उत्सुकता आहे.
भाजपकडून विविध समाज घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून आले. दुसरीकडे एका जागेसाठी एमआयएमकडून गाजी जहागीरदार,नईम सालार,फिरदोस पटेल या तीन जणांनी अर्ज दाखल केले आहेत. 

एकंदर स्वीकृत सदस्यपदाची लॉटरी कोणाला लागणार याची अनिश्चितता बुधवारी कायम होती. ही लॉटरी नेमकी कोणाला लागणार याची स्पष्टता शुक्रवार, दि. २० फेब्रुवारीच्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत होणार आहे.
दरम्यान बुधवारी महापालिका आयुक्त कार्यालयात नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी उमेदवारी अर्ज स्वीकारले. एकूण ६२ अर्ज आले तरी सर्वांच्या नावांची यादी महापालिका प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत उपलब्ध होऊ शकली नाही.    


       
या इच्छुकांनी दाखल केले अर्ज - आज नियोजित वेळेत भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर,प्रभाकर जामगुंडे, जगदीश पाटील,शशी थोरात,अक्षय आंजिखाने,श्रीनिवास दायमा,सुधा अळळीमोरे,श्रीकांत घाडगे,जवाहर जाजू,अनुप खंडेलवाल,केतन शहा,वृषाली चालुक्य,पांडुरंग दिड्डी,ॲड. राजन दीक्षित,ॲड.साधना संगवे,सूरज चव्हाण,कृष्णा झंवर, महेश तापडिया, लक्ष्मीकांत दरक,मल्लिनाथ राचेटि,सोमनाथ केंगनाळकर,रुद्रेश बोरामणी,देवेंद्र भंडारे,नागेश भोगडे,सचिन कुलकर्णी,जय साळुंखे,एमआयएमएम कडून नईम सालार, गाजी जहागिरदार,फिरदौस पटेल यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी अपक्ष म्हणून असे एकूण ६२ इच्छुकांनी अर्ज भरले आहेत.

अंतिम उमेदवारी 'सीएम' निश्चित करणार - तडवळकर भाजपचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महापालिकेत आलेल्या  शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की,भाजपतर्फे २० जणांनी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी अंतिम नऊ नावांची निश्चिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होणार आहे. ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांना दुसऱ्या ठिकाणी संधी देण्यात येईल. दरम्यान तडवळकर यांनीदेखील अर्ज भरला आहे. भाजपचे एक व्यक्ती एक पद धोरण आहे. तेव्हा आपण दोन्ही पदावर कसे राहता? असे पत्रकारांनी विचारले असता तडवळकर म्हणाल्या की,पक्ष जे आदेश देईल त्याप्रमाणे आपण एक पद सोडण्यास तयार आहोत. 

अंतिम नावे शुक्रवारीच निश्चित होणार - काळे  स्वीकृत सदस्य नियुक्तीबाबत महापालिकेतील सभागृहनेता नरेंद्र काळे यांनी सांगितले की,महापालिका स्वीकृत सदस्यपदासाठी अंतिम उमेदवारी निश्चितीची घोषणा प्रदेश भाजपकडून शुक्रवार,दि. २० फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यानुसार या नावांची घोषणा आम्ही त्यादिवशी महापालिका सभेत करणार आहोत. या पदासाठी पक्षाचा कार्यकर्ता हा निकष आहे. पक्षासाठी अनेक वर्षे काम केलेला पण पदापासून वंचित असलेल्या कार्यकर्त्याला स्वीकृत सदस्यपदाची संधी देण्यात येणार आहे.

एमआयएमतर्फे नईम सालार निश्चित - शेख एमआयएम पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून स्वीकृत नगरसेवकसाठी नईम सालार यांचे नाव अधिकृतरित्या आले आहे. त्यानुसार आम्ही त्यांचा अर्ज भरला आहे. इतर कोणी अर्ज भरला असेल तर आम्हाला त्यांची माहिती नाही,असे एमआयएमच्या गटनेत्या वहिदा भंडाले - शेख यांनी सांगितले. यावेळी या पक्षाचे नगरसेवक उपस्थित होते.