पोलीस निरीक्षकाकडून तक्रार नोंदविण्यास नकार व अपमानास्पद वागणूक - पीडित महिलेकडून वरिष्ठांकडे दाद
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वैराग पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी एका अनुसूचित जातीतील महिलेला तक्रार नोंदवून घेण्यास नकार देत,अपमानास्पद व धमकीजनक वागणूक दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
रतंजन,ता.बार्शी,जि.सोलापूर येथील रहिवासी सौ. सुवर्णा बबन उर्फ सहदेव डोलारे (वय ३० वर्षे) यांनी दिलेल्या माहितीनुसार,त्यांच्या गावातील काही व्यक्तींनी त्यांचा विनयभंग केला असून यासंदर्भात त्यांनी दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी वैराग पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी तक्रार घेण्यास नकार देत “तुला काय करायचं ते कर” अशा शब्दांत धमकावले तसेच पोलीस ठाण्यातून हाकलून दिल्याचा आरोप आहे.
तक्रारदार महिलेने पुढे सांगितले की,त्यांनी पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज व भेटींद्वारे दाद मागितली. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाईचे आश्वासन मिळाले असले तरी अद्याप कोणतीही एफआयआर दाखल करण्यात आलेली नाही.
न्याय न मिळाल्याने अखेर दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी तक्रारदार महिलेला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा द्यावा लागला आहे.
सदर प्रकरणात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा,भारतीय न्याय संहिता तसेच प्रशासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप असून संबंधित पोलीस निरीक्षकावर तात्काळ निलंबन करून निष्पक्ष चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी तक्रारदार महिलेकडून करण्यात येत आहे.
या घटनेमुळे पोलीस यंत्रणेतील संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून,सामान्य नागरिक विशेषतः महिलांना न्याय मिळणार का,असा सवाल उपस्थित होत आहे.
