Ticker

6/recent/ticker-posts

बुधवारी भाजपच्या नूतन नगरसेवकांच्या गटाची नोंदणी....

सोलापूर महापालिका;भाजपचा गटनेता निवड लांबणीवर!

सोलापूर : सोलापूर महापालिकेतील भाजपचा गटनेता निवडीसाठी शनिवार २४ जानेवारी रोजी भाजपची बैठक बोलवण्यात आली होती,पण या बैठकीत केवळ चर्चा झाली, मात्र गटनेतापदाची निवड होऊ शकली नाही. महापालिका गटनेता निवडीसाठी भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक शनिवारी सारस्वत मंगल कार्यालय येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. 





यावेळी भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर,आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने,मनीष देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत गटनेता निवडला जाईल अशी अपेक्षा होती,मात्र ती फोल ठरली. गटनेते पदाची निवड येत्या बुधवार, दि. २८ जानेवारी रोजी पुणे येथे विभागीय आयुक्त कार्यालयात भाजपच्या नूतन नगरसेवकांच्या गटाची नोंदणी झाल्यानंतर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. नोंदणी करण्यासाठी दि.२८ जानेवारी रोजी सकाळी ०५:३० वाजता  सर्व नगरसेवक दोन लक्झरी बसेसने पुण्याकडे रवाना होतील. सकाळी १०:३० च्या सुमारास विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी प्रक्रिया पार पाडली जाईल,असे सांगण्यात आले. दरम्यान आजच्या बैठकीत महापालिकेत भाजपचा गट स्थापन व महापौर निवडीबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आले.





दगाफटका होऊ नये म्हणून नोंदणीची खबरदारी - सोलापूर महापालिकेत सन २०१७ टर्ममध्ये भाजपमध्ये आमदार विजयकुमार देशमुख व आमदार सुभाष देशमुख असे दोन गट होते. या दोन्ही गटांची भिन्न भूमिका असल्याने महापालिकेच्या कारभारात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यावेळी महापालिकेतील महापौर,स्थायी समिती सभापती आदी पदांच्या निवडीवेळी भाजपच्या नगरसेवकांमध्ये भिन्न भूमिका असल्याने पेच निर्माण झाल्याचे सर्वश्रुत आहे. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवून पक्षाला दगाफटका बसू नये म्हणून भाजपने नगरसेवकांच्या गटाची नोंदणी विभागीय आयुक्त कार्यालयात करण्याची खबरदारी घेतली आहे. नोंदणीमुळे भाजपचे सर्व नगरसेवक पक्षाशी बांधिल जातील. त्यांना पक्षाच्या आदेशाविरोधात जाता येणार नाही.