भायखळ्यात प्रजासत्ताक दिन साजरा
भारतीय संविधान चिरायू होवो
मुंबई : देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत भायखळा विभागात तरुणांच्या पुढाकाराने भीम नगर प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांचे आयोजन करून अनोख्या पद्धतीने नागरिकांनी प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला.
देशात प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या देशाप्रती आदर, प्रेम,भक्ती भावना व्यक्त करण्याकरिता वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असतात. यामध्ये राजकीय पक्ष,संघटना,संस्था,सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक पुढे असतात. भायखळ्यातील तरुणांनी ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत भीम नगर प्रीमियर लीगचे आयोजन केले. देशाप्रती आदर व्यक्त करण्याच्या हेतूने व प्रजासत्ताक दिनाचे महत्व स्थानिकांमध्ये पोहोचविण्याच्या उदात्त हेतुने तरुणांच्या पुढाकाराने या क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.
स्थानिक नागरिकांनी सकाळी सामूहिक राष्ट्रगीत गाऊन एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या सदिच्छा देत भारत माता की जय,भारतीय संविधानाचा विजय असो,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला. नंतर अल्पोपहाराचा स्वाद घेत आनंद साजरा केला. तीन दिवसापासून चालू असलेल्या क्रिकेट सामन्यात लहान-मोठ्यांनी सहभाग नोंदविल्यामुळे लीगला व्यापक रूप आल्यामुळे रोमांचक सामने झाले. तसेच आयोजकांच्या वतीने दुपारच्या सामूहिक भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. नवनिर्वाचित नगरसेवक रमाकांत रहाटे यांनी आपली उपस्थिती लावत खेळाडूंना सदिच्छा देत प्रजासत्ताक दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मनोज कदम यांनी रहाटे यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
शेवटी विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज कदम, जितेंद्र कदम,सुजल शिर्के,रोहन कांबळे,तुषार सरोदे,सुजल पवार,प्रतिक पवार,अक्षय पवार,आर्द्रश जाधव,आशिष जाधव,योगेश गायकवाड,चंदन ठाकुर,जय सुर्वे,शादाब, आदिराज जाधव,कार्तिक शिर्के,नितीन सोनवणे,मुकेश शिर्के,राकेश शिर्के,श्रीकांत वाढाणे यांनी मेहनत घेतली.
