माहिती तंत्रज्ञान नियमांमुळे समाजमाध्यम व्यासपीठांवरील दिशाभूल करणाऱ्या आशय सामग्री विरोधात नागरिकांचे सक्षमीकरण
वृत्त आणि चालू घडामोडींच्या प्रकाशक/ प्रसारकांना माहिती तंत्रज्ञान नियमांअंतर्गतच्या नीतीमूल्य संहितेचे पालन करणे बंधनकारक
संविधानाच्या कलम 19 (1) अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्य संरक्षित आहे. डिजिटल माध्यम व्यासपीठांवरील खोट्या, असत्य आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीच्या वाढत्या प्रमाणाची दखल केंद्र सरकारनेही घेतली आहे.
केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 अंतर्गत माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल माध्यम नीतीमूल्य संहिता) नियम, 2021 (दिनांक 25 फेब्रुवारी 2021) अधिसूचित केले आहेत.
या नियमांच्या भाग-III मध्ये,इतर गोष्टींबरोबरच, वृत्त आणि चालू घडामोडींच्या प्रकाशकांनी/ प्रसारकांनी पाळायची नीतीमूल्ये संहिता आखून दिली आहे. यात केबल दूरचित्रवाणी व्यवस्था कायदा, 1995 अंतर्गत आखून दिलेल्या कार्यक्रम संहिता आणि प्रेस कौन्सिल कायदा, 1978 अंतर्गत असलेल्या पत्रकारिता प्रक्रियाविषयक पालन करण्याच्या मानकांचाही अंतर्भाव आहे.
माहिती तंत्रज्ञान नियमांअंतर्गत नीतीमूल्ये संहितेच्या पालनासाठी त्रिस्तरीय तक्रार निवारण यंत्रणेचा आराखडाही आखून देण्यात आला आहे.
याचबरोबरीने, माहिती तंत्रज्ञान नियमांच्या भाग-II मध्ये, इतर गोष्टींबरोबरच, YouTube आणि Facebook यांसारख्या मध्यस्थांवर उघडपणे खोट्या, असत्य किंवा दिशाभूल करणाऱ्या स्वरूपाच्या माहितीचा प्रचार-प्रसार रोखण्याची बंधनकारक जबाबदारी दिली गेली आहे.
केंद्र सरकारशी संबंधित खोट्या बातम्या तपासण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या पत्र सूचना कार्यालया मध्ये नोव्हेंबर 2019 मध्ये तथ्य तपासणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या मंत्रालये/विभागांतील अधिकृत स्रोतांकडून बातम्यांची सत्यता पडताळून पाहिल्यानंतर, तथ्य तपासणी कक्ष आपल्या समाजमाध्यम व्यासपीठावर योग्य माहिती प्रकाशित करतो.
माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम 69 अ अंतर्गत,केंद्र सरकार भारताचे सार्वभौमत्व आणि एकता, भारताचे संरक्षण,सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेच्या हितासाठी संकेतस्थळे,समाजमाध्यम खाती आणि पोस्ट अवरोधित करण्यासाठी आवश्यक आदेश जारी करते.
माहिती आणि प्रसारण तसेच संसदीय व्यवहार राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन यांनी आज राज्यसभेत डॉ.लक्ष्मीकांत वाजपेयी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
