Ticker

6/recent/ticker-posts

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणारे मृत्यू हे मानवी हक्कांचे उल्लंघन


प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन ; नुकसान भरपाईसाठी न्यायालय जलद कारवाई करण्याचे आश्वासन ; मानवाधिकार पुरस्कार वितरण सोहळा 

पुणे : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणारे अपघाती मृत्यू हे मानवी हक्कांचे थेट उल्लंघन आहे. अशा प्रकरणांमध्ये पीडितांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी न्यायालय जलद गतीने कारवाई करेल, असे प्रतिपादन पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी केले.


जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त 'मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था', 'जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,पुणे' आणि 'जाधवर लॉ कॉलेज,पुणे' यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथे 'जागर मानवी हक्काचा' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश रेवती देशपांडे, प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर,निवृत्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.व्ही.जटाळे,निवृत्त लेफ्टनंट कर्नल श्रीश कुमार,जाधवर इन्स्टिट्यूटसचे उपाध्यक्ष ॲड.शार्दूल जाधवर,मानवी हक्क संरक्षण संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर आदी उपस्थित होते.




महेंद्र महाजन म्हणाले,मानवी हक्काबद्दलची जागरूकता आजही समाजात कमी आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी 'जागर मानवी हक्काचा' सारखे उपक्रम महत्त्वाचे आहेत. कायद्याप्रमाणे सत्र न्यायालयाच्या ठिकाणी 'मानवी हक्क न्यायालय' असल्याचे फलक लावण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

न्यायाधीश रेवती देशपांडे म्हणाल्या,कोणतीही गरीब किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती पैशाअभावी न्यायापासून वंचित राहू नये,यासाठी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातत्याने प्रयत्नशील आहे. 


प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर म्हणाले,समाजसेवा हे असे कार्य आहे की ते अनेक संघटनांनी पुढाकार घेऊन करणे आवश्यक आहे. आपण करत असलेल्या कार्यातून इतरांनीही प्रेरणा घेऊन पुढे यावे,असे त्यांनी सांगितले. ॲड.शार्दुल जाधवर म्हणाले,लोकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी वकिलांची असते. मात्र वकिलांनी केवळ पैसे कमावण्याच्या मागे न लागता समाजाप्रती असलेले देणे विसरू नये. पैशाला बळी न पडता गरीब व शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा दिला पाहिजे. 




कार्यक्रमात लेखक विकास कुचेकर लिखित 'संविधान बोलतंय' या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला यामध्ये मानवाधिकार पुरस्कार सुभाष खुटवड (प्रसिद्ध पत्रकार),भूषण मंजुळे (अभिनेता), सुजाता इळवे, सचिन होळकर, प्रतिमा काळे आणि संतोष जोगदंड यांना प्रदान करण्यात आला तर  विशेष कार्य मानवाधिकार पुरस्कार समाजबंध सामाजिक संस्था,फ्यूअल ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स,संविधान संवाद समिती, संजीवनी इन्स्टिट्यूट (कराड),मतिमंद मुलांची शाळा (बाळकृष्ण देवधर),दिशा परिवार,मनोब्रम्हा फाउंडेशन, लोकसेवा परिवार संस्था (सातारा),ॲड.रशिद के.सिद्दीकी,ॲड.उमाकांत आदमाने,संजना करंजावणे आणि प्रकाश बोंदाडे यांना प्रदान करण्यात आला

कार्यक्रमाचे आयोजन मानवी हक्क संरक्षण संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर,संस्था संचालक अण्णा जोगदंड,गजानन धराशीवर,मुरलीधर दळवी,संगीत जोगदंड आणि प्राचार्य देव जाधवर विधी महाविद्यालय,सुरेश वाघमारे यांनी केले होते.