सोलापूर : सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने चाकूचा धाक दाखवून ११ लाख रुपये दरोडा टाकल्याच्या प्रकरणातील आरोपी बाबू रामा राठोड (रा.दोड्डी,दक्षिण सोलापूर,सोलापूर) यास सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
सदर गुन्हा सोलापूर तालुका पोलिस ठाणे येथे गु.र. क्र. ०४४८/२०२५ नुसार,भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम ३१०(२) अन्वये दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी आरोपी बाबू रामा राठोड,श्रीकांत लिंबाजी राठोड,अनिल रामचंद्र राठोड,करण राठोड आणि इतर एक अनोळखी इसम यांच्या विरोधात नोंदविण्यात आला होता.
फिर्यादी संजयकुमार अंबादास राठोड (जवरगी रोड, उदयनगर,कलबुर्गी,राज्य कर्नाटक) यांनी दिलेल्या सविस्तर फिर्यादी जबाबानुसार ते बांधकामासाठी लागणारे मजूर पुरविण्याचे काम करून उदरनिर्वाह करतात. त्यांची ओळख विजय दासू राठोड आणि त्यामार्फत श्रीकांत लिंबाजी राठोड (रा.दोड्डी तांडा, सोलापूर) यांच्याशी झाली. मार्च २०२५ मध्ये फिर्यादीने सोलापूर येथे येऊन श्रीकांत राठोड,अनिल रामचंद्र राठोड,बाबू रामा राठोड आणि करण राठोड यांची भेट घेतली होती.
श्रीकांत राठोड यांनी फिर्यादीस कमी किंमतीत कोणी सोने घेण्यास गिऱ्हाईक आहे का बघ असे सांगितले होते. फिर्यादीचे मित्र संजु जेमळा पवार आणि आकाश शंकर राठोड या दोघांच्या ओळखीमुळे महादेव सोनार यांच्याशी फिर्यादीची ओळख झाली. महादेव सोनार यांना दोड्डी येथील श्रीकांत राठोड हे त्यांच्या कडील "२ किलो सोने" कमी किमतीत विकणार आहे,असे सांगितले होते. ही बाब महादेव सोनार यांनी आकाश शंकर राठोड यांना सांगितली.
२ जुलै २०२५ रोजी फिर्यादी व संजु जेमळा पवार असे दोघेजण कलबुर्गी येथुन श्रीकांत राठोड यास दोड्डी तांडा येथे त्यांच्या राहत्या घरी भेटले. या भेटीत श्रीकांत राठोड यांनी विकणाऱ्या सोन्याचा सँपल दिला होता,तो सँपल फिर्यादीने महादेव सोनार यांना दाखविला, सोन्याच्या सँपलची तपासणी केली असता हे सोन्याचे सँपल खरे असल्याचे महादेव सोनार यांनी सांगितले.
यानंतर ६ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ वाजता फिर्यादी संजयकुमार राठोड,युसुफ पटेल,संजु पवार,आकाश राठोड आणि महादेव सोनार हे सर्वजण कलबुर्गीहून ब्रेझा चारचाकी मधून दोड्डीकडे रवाना झाले. दुपारी कुंभारी येथे पोहोचल्यानंतर श्रीकांत राठोड याच्या संपर्काने अनिल राठोड त्यांना घेण्यासाठी आला आणि सर्वजण दोड्डी तांड्याजवळ बाबू राठोड यांच्या शेताजवळील जागी पोहोचले.
तेथे श्रीकांत राठोड,अनिल रामचंद्र राठोड,करण राठोड, बाबू रामा राठोड आणि एक अनोळखी इसम उपस्थित होते. श्रीकांत राठोड याने बुद्धाची सोन्याची मूर्ती दाखवून रक्कम मागितली. त्यानंतर वाहनाची तपासणी करताना गाडीत ठेवलेली ११ लाखांची रोख रक्कम त्यांना दिसली. त्या रकमेवरून वाद निर्माण झाला आणि अनिल राठोडने चाकू बाहेर काढून सर्वांना धाक दाखवला,तसेच आरोपींनी फिर्यादीकडून जबरदस्तीने रक्कम काढून घेतली.
घटनेनंतर फिर्यादी व त्याचे साथीदार घाबरून कलबुर्गीकडे परतले. नंतर महादेव सोनार यांनी ती मूर्ती तपासली असता ती खोटी सोन्याची मूर्ती असल्याचे दिसून आले. त्यामुळे आरोपींनी खोट्या सोन्याच्या बहाण्याने चाकूचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची भीती दाखवून फिर्यादीकडून ११ लाख रुपये फसवणुकीने काढून घेतल्याचे निष्पन्न झाले.
सदर प्रकरणात आरोपी बाबू रामा राठोड यांनी अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय,सोलापूर येथे दाखल केला होता. सदर अर्जावर सुनावणी दरम्यान जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश अ.राणे यांनी दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
या प्रकरणात आरोपीतर्फे - ॲड.कदीर औटी,ॲड. दत्तात्रेय कापुरे,ॲड.पैगंबर सय्यद,ॲड.वैभव बोंगे,ॲड. ओंकार फडतरे,ॲड.मोहीम पठाण,ॲड.शिवरत्न वाघ आणि ॲड.मनिष बाबरे यांनी काम पाहिले.