सोलापूर : महसूलमंत्र्याच्या घोषणेने राज्यातील मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनीकांवर उपासमारीची वेळ येणार असून हजारो संसार उघड्यावर पडणार आहेत. त्यामुळे राज्यस्तरीय अधिवेशनात शासनाच्या निर्णया विरोधात पुढील दिशा व धोरण ठरविण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य मुद्रांक विक्रेता दस्त लेखनीक संघटनेचे अध्यक्ष शंकर भिसे यांनी सांगितले.
घरबसल्या इ-स्टॅम्प खरेदी,दस्त लेखनी करीता कोणत्याही मुद्रांक विक्रेत्याकडे जाण्याची गरज नसून पेपर बाॅन्ड ऐवजी इलेक्ट्रॉनिक बाॅन्डचा वापर करण्याचे वक्तव्य महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच केले आहे. त्यामुळे राज्यातील मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनीकांवर उपासमारीची वेळ येणार असून हजारो कुटुंबांचा संसार उघड्यावर पडणार आहेत. पंढरपूर येथील राज्यस्तरीय अधिवेशनात त्यावर सखोल चर्चा करून पुढील दिशा व धोरण ठरविण्यासाठी रविवार ५ आक्टोंबर रोजी त्यांचे आयोजन करण्यात आले असल्याचे महाराष्ट्र राज्य मुद्रांक विक्रेता दस्त लेखनीक संघटनेचे अध्यक्ष शंकर भिसे यांनी सांगितले.
पंढरपूर येथे सोलापूर जिल्हा मुद्रांक विक्रेता दस्त लेखनीक संघटनेच्या वतीने "राज्यस्तरीय अधिवेशनाचे" आयोजन रविवार ५ आक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले असल्याचे तनवीर खान व जावेद चौधरी यांनी सांगितले. पंढरपूर येथील नवीन कराड नाका हाॅटेल सहारा शेजारी रसोई गार्डन येथे राज्यातील सर्व जिल्हा संघटनेचे पदाधिकारी व मुद्रांक विक्रेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी इतर अडचणी,समस्या व मागण्या संदर्भातही सखोल चर्चा होणार असल्याने सर्व मुद्रांक विक्रेते व लेखनीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.