लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरपंच व पदाधिकारी यांचे सहकार्य अतिशय महत्वपूर्ण - मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम.
मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा घरकुल पाहणीसाठी मार्डी,नान्नज,अकोलेकाटी गाव भेट दौरा
सोलापूर : प्रधानमंत्री आवास योजना टप्पा - २ अंतर्गत गावातील लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरपंच व पदाधिकारी यांचे सहकार्य अतिशय महत्वपूर्ण आहे अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी व्यक्त केली.
उत्तर पंचायत समितीच्या सभागृहामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम हे बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक अमोल जाधव,सहाय्य्क गट विकास अधिकारी बाबासाहेब पाटील,विस्तार अधिकार (पंचायत) सोमनाथ शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी,शाखा अभियंता,पालक अधिकारी आदी उपस्थित होते.ते पुढे म्हणाले,प्रधानमंत्री आवास योजना टप्पा - २ अंतर्गत गावातील लाभार्थ्यांचे घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी यांनी वेळेत नियोजन करून अंमलबजावणी करावी शिवाय यासाठी सरपंच आणि पदाधिकारी यांचे सहकार्य अतिशय महत्वाचे असल्याने त्यांचा सहभाग वाढवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
सदर बैठकीनंतर उत्तर सोलापूर तालुक्यातील ज्या ग्रामपंचायती मध्ये मोठ्या प्रमाणात घरकुल प्रलंबित आहेत अशा नान्नज,अकोलेकाटी व मार्डी या ग्रामपंचायतींना व लाभार्थ्यांना त्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या. तालुक्यातील मार्डी नान्नज व अकोलेकाटी येथे भेट देऊन कामाच्या प्रगतीची पाहणी केली. या लाभार्थ्यांना पाच ते सहा महिन्यापूर्वी पहिला हफ्ता देण्यात आलेला असताना अद्याप बांधकाम सुरू नसलेली संख्या मोठी आहे. यापुढील १० दिवसांमध्ये सर्व लाभार्थ्यांचे बांधकाम सुरू करून दुसरा हफ्ता देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी सर्व संबंधितांना दिल्या.
तालुक्यातील ग्रामपंचायत मार्डी येथील भेटीच्या कार्यकारणी सदस्य शहाजी पवार हे उपस्थित होते,त्यांनी गावातील घरकुलाचे उद्दिष्ट्य पूर्तीसाठी सर्व प्रकारची मदत करून घरकुल पूर्ण करण्याबाबत सरपंच, ग्रामपंचायत कार्यकारणी यांच्या सहकार्याने हमी दिली. तसेच भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकारी साहेब यांच्यासोबत चर्चा करून विशेष प्रयत्न करून जागा उपलब्ध करून देणार असल्याचेही सांगितले.यावेळी मार्डी गावामधील नव्याने सुरू होणाऱ्या घरकुलांचे उद्घाटन मुख्य कार्यकारी जंगम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक अमोल जाधव,सहाय्य्क गट विकास अधिकारी बाबासाहेब पाटील,विस्तार अधिकार (पंचायत) सोमनाथ शिंदे,सरपंच प्रांजली पवार,काशिनाथ कदम,युवराज पवार,सदस्य,संजय इनामदार,गणेश पवार,अझर शेख, प्रभाकर फुलसागर,नागनाथ भालेराव,नंदकुमार पाटील ग्रामपंचायत अधिकारी तसेच मोठ्या प्रमाणात घरकुल लाभार्थी व नागरिक उपस्थित होते.