Ticker

6/recent/ticker-posts

पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जागतिक प्रचार मोहिमेचा शुभारंभ


मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवीर बृहन्मुंबई महानगरपालिका आणि भामला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वातावरण बदलाच्या जनजागृतीसाठी जागतिक प्रचार मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,पर्यावरणाचा सर्वात मोठा शत्रू ‘सिंगल यूज प्लास्टिक’ असून त्याचा वापर थांबवणे म्हणजे पर्यावरण संवर्धनासाठीचा सकारात्मक निर्णय होय. त्यांनी सर्व नागरिकांना राज्य सरकारच्या 10 कोटी वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,कमी प्लास्टिक वापरून आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विघटनक्षम प्लास्टिक निर्माण करून पर्यावरणीय धोके टाळणे शक्य आहे. यासोबतच,वृक्षलागवड मोहिमेत केवळ झाडे लावणे नव्हे,तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ती झाडे जिवंत ठेवण्याची जबाबदारीही घेतली जाणार आहे.

मुंबईत देशातील सर्वात मोठी सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था तयार होत असून भविष्यात समुद्रात फक्त प्रक्रिया केलेले सांडपाणीच सोडले जाणार आहे, ज्यामुळे दुर्गंधीही दूर होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2030 पर्यंतच्या ‘नेट झिरो’ संकल्पनेच्या दिशेने महाराष्ट्र ठोस पावले उचलत असून 2026 पर्यंत कृषी क्षेत्रासाठी लागणारी 16 हजार मेगावॉट ऊर्जा सौर ऊर्जेच्या माध्यमातून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याशिवाय,राज्यातील सार्वजनिक वाहतूक सेवा हळूहळू ग्रीन एनर्जीवर वळवली जात आहे. मुंबईमध्ये याची अंमलबजावणी सुरु झाली असून संपूर्ण वाहतूक सेवा ‘सिंगल टिकीट प्रणाली’ वर आणण्याची तयारी सुरु आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

याप्रसंगी अभिनेता अजय देवगण अभिनित 'प्यासा' ही जनजागृतीपर प्रचार मोहीमही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाँच करण्यात आली,जी सिंगल यूज प्लास्टिक विरोधात जनजागृती करणार आहे. कार्यक्रमास गोवा राज्याचे परिवहन मंत्री मौविन गोडिन्हो,गोदरेज कंपनीचे नादिर गोदरेज,गीतकार स्वानंद किरकिरे उपस्थित होते.