५४ मीटर रस्त्यासाठी आयुक्तांचे आभार; सोलापूर विकास मंचच्या शिष्टमंडळाची डॉ.सचिन ओंबासे यांच्याशी विशेष भेट
शहर विकासाच्या दृष्टीने चार महत्त्वाच्या मागण्यांबाबत तातडीने कारवाईची विनंती; आग्निशमन,सर्विस रोड,रेल्वे पुलाच्या विस्तारीकरणावर भर_
सोलापूर : सोलापूर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सुरू झालेल्या ५४ मीटर रस्त्याच्या कामासाठी मनपा आयुक्त डॉ.सचिन ओंबासे यांचे सोलापूर विकास मंचच्या शिष्टमंडळाने विशेष आभार मानले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातील जुना उड्डाण पूल पाडल्यानंतर उद्भवणाऱ्या वाहतूक समस्येवर मोठा दिलासा देणारा हा रस्ता ठरणार आहे,असे शिष्टमंडळाने यावेळी सांगितले.
या भेटीत आयुक्तांनी शहरातील विविध प्रकल्पांबाबत सुरू असलेल्या कामांची माहिती दिली,तर शिष्टमंडळाने पुढील महत्त्वाच्या चार मुद्द्यांवर तातडीने कारवाईची मागणी केली:
१) ५४ मीटर रस्ता सोरेगावपर्यंत तातडीने पूर्ण करावा
अवंतिनगर-सीएनएस हॉस्पिटल रस्ता सध्या सुरू असला तरी तो आराखड्यानुसार सोरेगावपर्यंत जातो. त्यामुळे सीएनएस हॉस्पिटल ते सोरेगाव या रस्त्याच्या भागातील अडथळे दूर करून तातडीने पूर्ण रस्ता तयार करावा, अशी विनंती करण्यात आली.
२) इंद्रधनु दमाणी नगरमध्ये अस्थायी अग्निशमन केंद्र सुरू करावे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातील पूल पडल्यानंतर रेल्वे लाईनपलिकडील वस्त्यांमध्ये आपत्कालीन प्रसंगी अग्निशमन यंत्रणा वेळेवर पोहोचू शकणार नाही. त्यामुळे नवीन पूल होईपर्यंत इंद्रधनु व दमाणी नगर परिसरात तात्पुरते अग्निशमन केंद्र सुरू करणे अत्यावश्यक असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.
३) विजयपूर रोडवरील सर्विस रोड तातडीने पूर्ण करावेत विजयपूर रोडवरील वाढती वाहतूक आणि अपघाताच्या वाढत्या शक्यतेमुळे राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंना प्रस्तावित सर्विस रोड तातडीने पूर्ण करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
४) पत्रकार चौक रेल्वे पुलाचे विस्तारीकरण तातडीने करावे कंबर तलावाजवळील रेल्वे पुलावर वाहतूक दाट असून दुर्घटनेचा धोका वाढला आहे. त्यामुळे या पुलाचे विस्तारीकरण ही काळाची गरज आहे. मनपा आणि रेल्वे विभागाने समन्वय साधून हा विषय तातडीने मार्गी लावावा.
या भेटीदरम्यान,झोन कार्यालयात नागरिकांच्या तक्रारी ऐकण्याचा उपक्रम,दुहेरी जलवाहिनीचे पूर्णत्व व पाकणी येथील प्रस्तावित जलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत आयुक्तांनी दाखवलेली तळमळ याचेही विशेष कौतुक शिष्टमंडळाने व्यक्त केले. सोलापूर विकास मंच शिष्टमंडळात केतन शहा,योगीन गुर्जर,मिलिंद भोसले, विजय कुंदन जाधव,अ़ॅड.दत्तात्रय अंबुरे,मनोज क्षिरसागर आदी सदस्य सहभागी होते.
जनतेची आशा - "आयुक्त डॉ. ओंबासे यांनी आजवर दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाचीच ही सुरूवात आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हे चारही मुद्दे तातडीने मार्गी लागतील,अशी अपेक्षा आम्ही ठेवतो," असे सोलापूर विकास मंचच्या वतीने सांगण्यात आले.
