सासू सुनेच्या भांडणात नरधामाने बायको,सावत्र आई व पोटच्या मुलाचा खून केल्याप्रकरणी आरोपीला कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा
सोलापूर : (प्रतिनिधी) बार्शी तालुक्यातील मौजे कोरफळे येथील आरोपी अनिरुद्ध व्यंकट बरडे याने त्याच्या घरी सतत होत असलेल्या बायको व सावत्र आईच्या भांडणाला कंटाळून दि.०९ फेब्रुवारी 2017 रोजी पहाटे ०३-०० वाजण्याच्या सुमारास घरी झोपलेल्या सावत्र आई सखुबाई व मुलगा सुदर्शन यांना हातोड्याने मारून जागीच ठार केले. त्याची पत्नी रेश्मा हिचे पोटात कुकरीने मारून,कुकरी फिरवून बाहेर ओढून काढून गंभीर जखमी करून तिच्या अंगावर रॉकेल टाकून काडीपेटीतील काडीने पेटवून दिले दवाखान्यात दाखल केल्यानंतर ती उपचारा दरम्यान मयत झाली. तसेच मुलगा अविनाश व मुलगी प्रतीक्षा यांनाही कुकरीने मारून जखमी केले. त्यानंतर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
सदर बाबत आरोपीचे वडील व्यंकट पंढरीनाथ बरडे यांनी आरोपी अनिरुद्ध व्यंकट बरडे रा.कोरफळे ता.बार्शी याचे विरुद्ध वैराग पोलीस ठाणेस गु.र.नं. ५१/२०१७ भा.द.वि.क ३०२,३०७,३०९ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास तत्कालीन API मधुकर पवार, API राजकुमार केंद्रे व API रवींद्र खांडेकर यांनी करुन आरोपीविरुद्ध सबळ पुरावा गोळा करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.
सरकार पक्षाच्या वतीने सदर गुन्हा शाबितीसाठी १६ साक्षीदार तपासण्यात आले. यातील आरोपीची बायको हिने दिलेला मृत्यूपूर्व जबाब,नेत्र साक्षीदार आरोपीची मुलगी, दुसरा मुलगा व डॉक्टर यांची साक्ष तसेच तपासी अंमलदार यांनी तपासा दरम्यान गोळा केलेले परिस्थितीजन्य पुरावे हे सरकारी वकिल श्रीमती राजश्री कदम,प्रदीप बोचरे यांनी न्यायालयासमोर मांडले.
सरकारी पक्षाचा पुरावा याचा विचार करता एल.एस.चव्हाण जिल्हा न्यायाधीश बार्शी यांनी आरोपी अनिरुद्ध व्यंकट बरडे रा.कोरफळे ता.बार्शी यास भादविक ३०२ अन्वये दोषी ठरवून जन्मठेप व १,००,०००/- रुपये दंड, यातील दंड न भरल्यास १ वर्ष सश्रम कारावास,भादविक ३०७ अन्वये दोषी ठरवून १० वर्ष शिक्षा व ५०,०००/- रुपये दंड,यातील दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली.
सरकार पक्षा तर्फे राजश्री कदम यांनी कायदेशीर बाबीवर जोरदार युक्तिवाद केला व काम पाहीले. तसेच कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार कुणाल पाटील,स.पो.फौ.शशिकांत आळणे यांनी वेळोवेळी साक्षीदार,पुरावे हजर ठेवण्याचे काम पाहिले. सदर केसमध्ये जालिंदर नालकुल उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी व कुंदन गावडे पोलीस निरीक्षक वैराग पोलीस ठाणे यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.
