मोहोळ येथे सुहाना मसाला कंपनीचे ट्रकच्या दरोडे प्रकरणात अटकेतील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे जामीन मंजूर.
सोलापूर : मोहोळ पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे क्रमांक- ३५९/२०२४ भादवि कलम ३९५ अन्वये एकूण ६ आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोहोळ येथे प्रवीण मसालेवाले यांचे घोडेश्वर(यवत) येथून एम एच ४५ ए एफ ८४२४ हा आयशर ट्रक सुहाना मसाले कंपनीचे माल घेऊन जात असताना सदर ट्रकचे ड्रायव्हर व क्लीनर मोहोळ येथे सायंकाळी पुणे सोलापूर हायवे येथे मेवात धाब्यावर थांबले असता सुमारे रात्री १०:४० वाजता सदरचे ट्रकच्या कडेने ५ ते ६ अनोळखी लोक फिरत असल्याचे दिसून आले. तसेच त्यातील एकाने हा ट्रक सोलापूरकडे जात आहे का असे विचारले असता त्यांनी ड्रायव्हरचा मोबाईल हातातून हिसकावून घेतला आणि एकाने लोखंडी गजाने क्लीनर साईडचा दरवाजाची काच फोडली होती. त्यानंतर सर्व आरोपींनी ड्रायव्हर व क्लीनर खाली ओढून त्या दोघांना लाथाबुक्याने मारहाण ही केली होती. आरोपींनी घडलेल्या घटने नंतर त्यातील २ आरोपी ट्रक घेऊन पसार झाले होते व इतर सर्वजण एका कार मध्ये बसून फरार झाले होते. त्यानंतर ११२ वर फोन केल्यानंतर सदरील तपास मोहोळ पोलिसांनी केला होता. सदरचे ट्रक मध्ये जीपीएस असल्याने ट्रक हे गावडी दारफळ ते पडसाळी या गावाच्या दरम्यान असल्याचे आढळून आले व पोलीस लागलीच ते ताब्यात घेण्यासाठी तेथे गेले असता आरोपी सागर भोजू पवार हा आढळून आला होता. संबंधित प्रकरणात केवळ दोन आरोपींना अटक करण्यात आले होते. या प्रकरणात ३६ लाख ६८ हजार ५९८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले होते. त्यानंतर आरोपी सागर भोजू पवार याने आपला जामीन अर्ज मे.जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता. तदनंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश खुणे यांनी आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे.
या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड.कदीर औटी,ॲड.इम्रान पाटील,ॲड.दत्तात्रेय कापुरे,ॲड.वैभव बोंगे यांनी काम पाहिले.
