Ticker

6/recent/ticker-posts

वाळुच्या खड्ड्यांमुळे अनुचित प्रकार घडल्यास सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करु !

आ.अमोल मिटकरी यांचा थेट चंद्रभागेच्या पात्रातूनच सरकारला इशारा!!  

पंढरपुर : दि.२५  (प्रतिनिधी) ऐन आषाढी यात्रा सोहळ्याच्या तोंडावरंच पंढरपूरातील चंद्रभागेच्या पात्रात अवैध वाळु उपशामुळे पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्‍न ऐरणीवर आलाय. महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी हा प्रश्‍न ठळकपणे शासन आणि विरोधी पक्षांच्या निदर्शनास आणुन दिल्याने आता विरोधी पक्षाचे नेतेमंडळी याविरुध्द आक्रमक झालेली आढळून येत आहेत. आज आमदार अमोल मिटकरी यांनी समाजसेवक गणेश अंकुशराव यांच्या समवेत जाऊन प्रत्यक्ष चंद्रभागेच्या पात्रातील वाळुउपशामुळे पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांची पाहणी केली. आषाढी वारी सुरु झाली असुन मोठया प्रमाणात पंढरीत भाविक दाखल होत आहेत तरीही प्रशासनाने येथील खड्डेही बुजवलेले नाहीत आणि अवैध वाळु उपसाही रोखला नाही. असे निदर्शनास आल्याने आ. अमोल मिटकरी यांनी हा प्रश्‍न विधानपरिषदेमध्ये उपस्थित करु आणि वारीकाळात जर या खड्ड्यांमुळे कांही अनुचित प्रकार घडला तर सरकारव सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करु! असा थेट इशारा आज आ.अमोल मिटकरी यांनी दिलाय.

चंद्रभागेतील अवैध वाळु उपशाबाबत महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी वारंवार पाठपुरावा केला असून याबाबत विविध आंदोलनेही केली आहेत. आमदार अमोल मिटकरी हे पंढरपूर येथे आले असता त्यांनी नदीपात्राची पाहणी केली. यावेळी  चंद्रभागेतील वाळू उपशामुळे पडलेल्या खड्ड्यांबाबत आणि चंद्रभागेतील दुषीत पाण्याबाबत तसेच अस्वच्छतेबाबत त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

याबाबत आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, महर्षी वाल्मिकी संघाने वारंवार पाठपुरावा करूनही सरकारने या अवैध वाळू उपशाची, चंद्रभागेच्या स्वच्छतेची दखल घेतली गेली नाही. पालकमंत्र्यांकडे तक्रार देऊनही केवळ कारवाईचा फार्स केला जात आहे. सरकारच्या या बेदखलपणामुळेच हा वाळू उपसा सुरू असून चंद्रभागेच्या पात्रात कमालीची अस्वच्छता पसरलेली आहे. याचा भाविकांच्या सुरक्षिततेबाबत मोठा प्रश्‍न निर्माण झाला असून भाविकांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे.  त्यामुळे आता तरी सरकारने दखल घेऊन चंद्रभागा नदीपात्रामध्ये होणारा वाळु उपसा संपूर्णपणे थांबवावा आणि चंद्रभागेची स्वच्छता करावी.

सध्या आषाढी वारी सोहळा असून यामध्ये या उपशामुळे पडलेल्या खड्ड्यांमध्ये कोणतीही घटना घडल्यास सरकार त्याची जबाबदारी घेणार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत असून जर काही अशी घटना घडल्यास सरकारवरच मनुष्यवराचा गुन्हा दाखल करण्याशिवाय पर्याय नाही. असा इशारा आमदार अमोल मिटकरी यांनी यावेळी दिला आहे.

यावेळ  महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव,राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीकांत शिंदे,आदित्य फत्तेपुरकर,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर भोसले,सतीश अभंगराव,सुरज पेंडाल,भागवत करकमकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


फोटो ओळी : अवैध वाळू उपशामुळे चंद्रभागेत पडलेल्या खड्ड्यामध्ये बसून सरकार विरुद्ध संताप व्यक्त करताना आमदार अमोल मिटकरी,महर्षी वाल्मिकी संघाचे गणेश अंकुशराव यांच्यासह इतर कार्यकर्ते.