या महाराष्ट्राच्या मातीनं अगदी अलिकडच्या काळात संत गाडगेबाबा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतीबा फुले असे एक ना अनेक नरवीर दिले. ज्या नरवीरांनी आपली वाणी, लेखणी आणि नाणी खर्ची टाकून व्यवस्था परिवर्तनासाठी अखंडपणे कार्य केले. या वैचारिक वंशावळीत राजे छत्रपती शिवाजी महाराजांचेही नांव येते. सह्याद्रीच्या कुशीत, घोड्यांच्या टापा अन् मावळ्यांच्या अथक कष्टानं राजे छत्रपतींचा इतिहास शब्दाकिंत झाला. त्यांचे वारसदार ' शनिवारी ' वाड्यावर पोहोचले. राजांना तोफांची सलामी मिळण्याऐवजी एका पत्रानं स्वागत झाले. महाराष्ट्र मनाचा माणूस म्हणून मन स्वतःशीच पुटपुटले, ' राजे, तुम्हीसुध्दा !
कधी काळी चाकाचा शोध लागल्यावर गतीमान झालेल्या मानवी विकासात अनेक बदल झालेले आहेत. हा माणूस प्रारंभी वर्णात अन् त्यानंतर धर्मात विभागला गेला. धर्म व्यवस्थेत विभाजीत झालेल्या माणसांनी जी जीवनपद्धती स्वीकारली, जणू तीच त्यांची संस्कृती बनली. ही संस्कृती विकसीत करण्यासाठी महाराष्ट्राच्या मातीनं जे समाजसुधारक दिले. ज्या सुधारकांनी तत्कालिन संस्कृति रक्षकांनी निर्माण व्यवस्थेवर वार आणि प्रहार केले.
अशा कार्यामुळे संतापलेल्या मंडळींनी, त्यांच्या कार्यात पदोपदी अडसर निर्माण केले. महात्मा फुलेंसारख्या समाज सुधारकावर हल्ला करण्यासाठी मारेकरीही धाडले. अगदी चालू घटनाक्रमात डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. एम.एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश ही त्याची प्रतिकं आहेत, असे दिसते.
या इतिहासाची पानं चाळत असताना विठ्ठलपंत कुलकर्णी यांच्या छळाचा दाखला इतिहासात मिळतो. ज्यांनी संन्यासाश्रम स्विकारल्यानंतर पुन्हा प्रपंच केल्याने तत्कालिन व्यवस्थेने माफ केले नव्हते. त्यांना पैठणच्या धर्मपीठाने देहांत प्रायश्चित दिले होते. त्यांनी सपत्निक शिक्षा भोगली, केवळ त्यांच्या मुलांचा त्यांच्यासारखाच छळ होऊ नये म्हणून... असे अनेकवेळा किर्तनात आजही ऐकायला मिळते.
परिवर्तन निसर्गाचा नियम आहे. त्याप्रमाणे या समाज सुधारकांच्या प्रयत्नाने इथल्या समाजात परिवर्तन दिसून आले. राजे शिवाजी महाराजांनी व्यवस्था परिवर्तनासाठी परकीय मुघलांशी लढा दिला तसाच संघर्ष त्यांना एत्तदेशीयांशी करावा लागला. राजे जसे मुस्लिमांशी लढले तसे हिंदूंच्या विरोधातही लढले. त्यांचा संघर्ष अन्याय-अत्याचाराच्या विरोधात होता. ते धर्मयुद्ध नव्हते तर केवळ सत्ता संघर्ष होता.
राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालात स्वराज्यातील शेतकरी जगला, परधर्मियांचा आदर आणि शत्रूपक्षातील स्त्रियांचाही सन्मान झाला. संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या भेटीत, राजांनी दिलेली भेटवस्तू तुकोबारायांनी ' धन आम्हा मृत्तिकेसमान ' असल्याचे सांगून स्वराज्यासाठी परत देऊ केले होते. ते स्वराज्य जतन व संवर्धनाचे काम राजांनी व त्यांच्या वारसदारांनी केले. या राजांची थोरवी ' कुळवाडी भूषण ' पोवाड्यातून महात्मा फुले यांनी सांगितली.
या स्वराज्यात छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर श्री छत्रपती शाहू महाराजांच्या भोळेपणाने जे पेशवे म्हणून स्वतंत्र रीतीने प्रसिद्धीस आले ते एकंदर सात पेशवे होत. बाळाजी विश्वनाश इ. स. १७१३ ते २०, बाजीराव बल्लाळ इ. स. १७२० ते ४०, बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब इ. स. १७४० ते ६१, माधवराव पहिले इ. स. १७६१ ते ७२, नारायणराव इ. स. १७७२ ते ७३ " सौ. गंगाबाई (नारायणरावाची बायको) इ. स. १७७३ ते ७४, सवाई माधवराव इ. स. १७७४ ते ९५ आणि दुसरा बाजीराव इ. स. १७९५ ते १८१८ असा पेशवाईचा प्रवास आहे.
नारायणरावांच्या खुनानंतर राघोबादादा यांनी पेंशवाईची वस्त्रे मिळविली. परंतु नाना फडणीसाच्या बारभाई कारस्थानाने राघोबादादा तोंडघशी पडला व पुढे नानाने नारायणरावांची विधवा गंगाबाई हिच्याच नावाने राज्यकारभार चालविला, असे संदर्भ
रामचंद्र नारायण लाड लिखीत ' मराठ्यांचे दासीपुत्र अर्थात पायपोस किंमतीचे पेशवे ' पुस्तकात मिळतो.
या पेशवाईत बाजीरावांचं कौतुक करणारा एक वर्ग आजही कार्यरत आहे.जे बाजीराव-मस्तानी ' च्या संबंधी तिखट मीठ लाऊन सिनेमे काढून पेशवाईचं उदात्तीकरण करीत आहेत. शिवाजी महाराजांचे स्वराज्य या पेशव्यांनी गिळंकृत केले. या पेशव्यांची कारकीर्द म्हणजे महाराष्ट्रावरील भयंकर संकटच होय, असे जाणणारा एक वर्ग समाजात आहे.
राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे अवघ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा त्यांच्या अर्थनीती समाजनीती आणि युद्धनीतीचा जगभर अभ्यास होत आहे. शिवकालातील ' शिवराज्याभिषेक ' प्रसंगी जे घडले, त्याकडे छळ म्हणूनच पाहिले जाते. आज त्यांच्या चरित्र आणि चारित्र्यावर शिंतोडे उडवणारे ' शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया ' या पुस्तकाचे लेखक जेम्स लेन यांना सहकार्य करणारे बाराभाई याच मातीतले... !
या बारा भाईंचा वारसदार श्रींदम, ज्याने छत्रपती शिवरांयाना लाखोली वाहिली.जे शेतकऱ्यांना . ' साले ' म्हणून शेतकऱ्यांचा अवमान करतात, सैनिक पत्नींचा अवमान, जे राजे छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करतात कि नाही, हा संशोधनाचा मुद्दा आहे, मात्र स्मृतिदिनी ढोल वाजवतात असे अनेक पराक्रम खात्यावर असलेला पक्ष, राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या माणसांचा पक्ष असू शकत नाही, असं समाजमन म्हणते.
राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत अपशब्द बोलणे हा शिवद्रोहच आहे. अहमदनगरचा शिवद्रोही आज पोलीस बंदोबस्तात आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेल्या हक्क आणि अधिकाराप्रमाणे आज कोणी कोठेही जाऊ शकतो. त्याला आपण का अपवाद असावे ? पण आपण जेथे गेलात तो शिवद्रोह्यांचा मेळा आहे, हे महाराष्ट्रातील बहुजन जाणतो.
राजे_
कालपर्यंतच्या सत्ता संपादनाच्या लढाया तलवारीच्या बळावर होत्या. आजच्या लोकशाहीत सत्ता संपादनासाठी मताचा पर्याय आहे. आपण अपक्ष म्हणून राहिले असते तरी उभ्या महाराष्ट्राने छत्रपतींचा पक्ष म्हणून आपणांकडे पाहिले असते. लोकशाही मार्गाने सत्ता संपादनासाठी एखादा पक्ष काढून छत्रपतींच्या वारसा हक्काने महाराष्ट्राला हाक दिली असती तर ' छत्रपतींचा पक्ष ' म्हणून सकल महाराष्ट्र आपल्या पाठिशी उभा राहिला असता, पण ते पाहण्याचे भाग्य आम्हा करंट्यांना लाभले नाही.
आज आम्हाला ' घटकंचुकी ' चा वारसा असणारी पेशवाई नको आहे. राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेला ' लाल महाल ' इतिहासजमा करून उभारलेल्या शनिवार वाड्यावर आपले जाणे, छत्रपती शिवाजी महाराजांवर निस्सिम प्रेम करणाऱ्यांना पटणारे नाही. स्वराज्यातील भोळ्या-भाबड्या रयतेला रुचणारेही नाही. पण आपण स्वतंत्र आहात, राजे !
प्रेमात, राजकारणात आणि युध्दात सर्व क्षम्य असते, असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील अठरा पगड समाजातील तरुणाई आपल्याकडे कालच्या स्वराज्यातून उद्याचे ' सुराज्य ' निर्माते म्हणून मोठ्या आशेने पहात होती. राजे छत्रपती शिवरायांविषयी अपशब्द बोलणारांशी मैत्री म्हणजे ' शिवद्रोह ' समजून बहुजनांनी कधीच हातमिळवणी केली नाही. शिवद्रोह्यांशी युती केली तर इतिहास आम्हाला माफ करणार नाही, ही भिती आजही आमच्या मनात आहे, पण राजे, उद्या आपण काय बोलावे, हे आपला पक्ष ठरविणार आहे, हे मात्र निश्चित... !
[सौजन्य - शिवराज्य पत्र संपादक
इक्बाल शेख,कासेगांव ]