Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकार संघ आणि छावा संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन

पत्रकारांच्या आर्थिक विकासाचे निर्णय राज्य सरकारने घ्यावेत

मुंबई : दि.१६ (प्रतिनिधी) वाढती महागाई, कागदाचे वाढत असलेले दर लक्षात घेता विद्यमान सरकारने द्विवार्षिक पडताळणी नंतर राज्यातील सर्व शासनमान्य यादीवरील वृत्तपत्रांचे जाहिरात दर दुपटीने वाढवून त्यांना आर्थिक पाठबळ द्यावे. या प्रमुख मागणीसह पत्रकारांच्या संदर्भात विविध मागण्या पत्रकार विकास संघाच्या वतीने वैभव स्वामी आणि छावा संघटनेच्या वतीने गंगाधर काळकुटे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची नंदनवन निवासी प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले.मुख्यमंत्र्यांनी यावर निश्चितच सकारात्मक निर्णय लवकर घेऊ असे अभिवचन दिले.


लोकशाहीचा चौथा स्तंभ वृत्तपत्र क्षेत्र सद्य परिस्थितीत आर्थिक अडचणीमुळे टिकवणे आणि वाढवणे अतिशय कठीण झाले आहे. कागद, शाई, प्लेट याचे दर गगनाला भिडले आहेत. दुसरीकडे मागील अनेक वर्षापासून शासनाच्या जाहिरात दरामध्ये वाढ झालेली नाही. शिवाय वृत्तपत्राच्या विक्री अंकाची किंमत देखील अतिशय नगण्य आहे. केवळ सेवा म्हणून सुरू असलेलं हे क्षेत्र भविष्यात आर्थिक अडचणीमध्ये येऊन संकटात सापडेल. तेव्हा या क्षेत्राला आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला आर्थिक पाठबळ राज्य सरकारने द्यावे अशी प्रमुख मागणी पत्रकार विकास संघ महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष वैभव विवेक स्वामी आणि छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर काळकुटे यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची मुंबई येथील नंदनवन शासकीय बंगल्यावर प्रत्यक्ष भेट घेऊन केली. 

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना निवेदन देताना - राष्ट्रीय छावा संघटनाचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर काळकुटे

यावेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये प्रामुख्याने,पत्रकारांच्या महत्त्वपूर्ण अधिवीकृती समिती मागील पाच वर्षापासून निवडण्यात आलेली नाही. सदरील शासकीय पत्रकार आधीस्वीकृती समिती तात्काळ गठीत करण्याचे आदेश द्यावेत, शासनमान्य यादीवरील शासकीय दर हा दिवार्षिक पडताळणी नंतर दुप्पट करावा, पत्रकारांना म्हाडा अंतर्गत घरकुल मध्ये विशेष सवलत द्यावी त्यांना हक्काचे घर द्यावे, महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातील शासकीय पत्रकार भवनांचे पुनर्जीवन करण्यात यावे,पत्रकारांच्या खाजगी चार चाकी वाहनांना महाराष्ट्रात टोलमाफी द्यावी, अधिस्वीकृती धारक पत्रकारांना एसटी महामंडळातील शिवनेरी आणि आराम गाडीमध्ये सवलत दिली जात नाही. या दोन्ही बसेस मध्ये पत्रकारांना विनामूल्य प्रवासाची सवलत लागू करावी,राज्य शासनाने जाहीर केल्यानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतंत्र माहिती भवन उभारणीचे काम तात्काळ हाती घेऊन जिल्हा माहिती कार्यालयाला स्वायत्तता द्यावी. जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना या माहिती भवन मध्ये निवासाची व्यवस्था करण्यात यावी. आदी प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

महसूल मंत्री राधाकृष्णाजी विखे पाटील यांना गुच्छ देताना


यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी पत्रकार विकास संघ,महाराष्ट्र आणि छावा संघटनेने पत्रकारांच्या संदर्भात केलेल्या मागण्या रास्त असून यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन पत्रकार विकास संघाचे अध्यक्ष वैभव स्वामी आणि छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर काळकुटे यांच्या शिष्टमंडळाला दिले.