Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्हा कारागृहात महिला बंद्यांसाठी समुपदेशन व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न


सोलापूर : सोलापूर जिल्हा कारागृह येथे महिला बंद्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि रिकाम्या वेळेचा सकारात्मक उपयोग व्हावा या उद्देशाने समुपदेशन व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात महिला बंद्यांना कौशल्यविकासासोबतच आरोग्यविषयक मार्गदर्शनही देण्यात आले.

अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक,कारागृह व सुधारसेवा,महाराष्ट्र राज्य,पुणे सुहास वारके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विशेष कारागृह महानिरीक्षक (मुख्यालय) योगेश देसाई आणि कारागृह उपमहानिरीक्षक (पश्चिम विभाग) सुनिल ढमाळ यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबविण्यात आला.


या कार्यक्रमाच्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ सोलापूर व इनरव्हील क्लब सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बंद्यांसाठी एक अत्याधुनिक शिलाई मशीन भेट देण्यात आली. या शिलाई मशीनच्या माध्यमातून महिला बंद्यांना शिवणकामाचे प्रशिक्षण घेता येणार असून त्यांना स्वावलंबनाच्या दिशेने पाऊल टाकण्याची संधी मिळणार आहे. तसेच कारागृहातील त्यांच्या रिकाम्या वेळेचा विधायक उपयोग होण्यासही मदत होणार आहे.

यावेळी स्त्रियांच्या आरोग्याशी संबंधित विविध आजार, त्यांची कारणे तसेच त्यावरील योग्य उपचार व प्रतिबंधक उपाययोजना याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.धनश्री केळकर यांनी सविस्तर समुपदेशन व मार्गदर्शन केले. महिलांनी आरोग्याबाबत जागरूक राहणे, नियमित तपासणी करणे तसेच स्वच्छतेचे महत्त्व यावर त्यांनी विशेष भर दिला. उपस्थित महिला बंद्यांनीही विविध प्रश्न विचारून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

या कार्यक्रमास कारागृह अधीक्षक सुशिल कुंभार,वरिष्ठ तुरुंगाधिकारी बिरू खळवुटे,तुरुंगाधिकारी विठ्ठल शिंदे, शिक्षक अंगद गव्हाणे,सोनिया चंकेश्वरा,ज्योस्त्ना दुरुल,कीर्ती गोडवलकर,संध्या इंच्या तसेच कारागृहातील महिला बंदी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला बंद्यांना कौशल्यविकासाची संधी मिळाल्याने त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत होणार असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. कार्यक्रमाबद्दल महिला बंद्यांनीही समाधान व्यक्त करत अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.