सोलापूर : दि.१७ (प्रतिनिधी) सोलापूर महापालिकेचे कनिष्ठ श्रेणी लिपिक तथा प्रभारी क्रीडाधिकारी नजीर दाऊदसाब शेख यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी शुक्रवारी तसे आदेश काढले आहेत.
शासकीय स्पर्धा आयोजनासाठी झालेल्या खर्चाची बीले लेखापरीक्षणासाठी - उपलब्ध करून दिली नाहीत. पार्क स्टेडियम गाळे भाडे वसुली,डिमांड रजिस्टर अद्ययावत न ठेवणे या अधिनस्त कर्मचाऱ्यांच्या कामावर कोणतेही नियंत्रण ठेवले नाही. दोन तुकडे पध्दतीने साहित्य खरेदी,कामकाजात अनियमितता आदी अनेक आक्षेप ठेवण्यात आले असून याप्रकरणी शेख यांची विभागीय चौकशी कार्यान्वित करण्यात आली आहे.
नजीर शेख यांनी क्रीडा विभागाअंतर्गत - असलेल्या पार्क स्टेडियम मधील ज्या गाळयाचे भाडे बऱ्याच कालावधीसाठी थकित आहे,असे गाळे ताब्यात घेवून चालू बाजार भावाने भाडे करारावर देवून महसूली उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले नाहीत. त्याच प्रमाणे स्टेडियमच्या गाळयाची भाडे वसूली,डिमांड रजिस्टर अद्यायवत ठेवणे या अधिनस्त कर्मचाऱ्याच्या कामकाजावर कोणतेही देखरेख व नियंत्रण ठेवले नाही.
या विभागा कडून खरेदी केलेले साहित्य - स्पेसिफिकेशन प्रमाणे आहे किंवा नाही याची तांत्रिक तपासणी करुन घेतली नाही. तसेच प्रभाग क्रं. 35 व तेथील व्यायाम शाळेसाठी एकाच पुरवठादारा करुन दोन तुकडे पध्दतीने साहित्य खरेदी केलेले आहे. तसेच पुरवठादाराशी करारपत्र करताना कमी मुद्रांक शुल्काच्या स्टॅम्प पेपरवर करारपत्र करुन शासकिय मुद्रांक शुल्काची कमी वसूली झाली अशा प्रकारचे आक्षेप लेखापरिक्षणात नोंदविण्यात आलेले आहेत. दरम्यान,या विभागीय चौकशीस बाधा येऊ नये म्हणून प्रभारी क्रीडाधिकारी नजीर शेख यांना सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी दिले आहेत.