Ticker

6/recent/ticker-posts

कुष्ठरोग,क्षयरोग मोहीम प्रभावीपणे राबवा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या सूचना

सोलापूर : दि.१० (प्रतिनिधी) कुष्ठरोग आणि क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यात 13 सप्टेंबरपासून 30 सप्टेंबर 2022 पर्यंत प्रत्येक घरोघरी जावून कुष्ठरोग आणि क्षयरोगाचा सर्वे करण्यात येणार आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केल्या.

जिल्हा परिषदेमध्ये कुष्ठरोग शोध मोहीम आणि सक्रिय क्षयरूग्ण शोध मोहिमेबाबतच्या जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत स्वामी बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.अनिरूद्ध पिंपळे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ.विलास सरवदे,मनपा आरोग्य अधिकारी डॉ.बसवराज लोहारे,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीकांत कुलकर्णी यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.

स्वामी यांनी सांगितले की, कुष्ठरोग आणि क्षयरोग हा आजार बरा होणारा आहे. तपासणी न करता आजार अंगावर काढू नका, किंवा आजार लपवू नका, यामुळे रूग्ण दगावू शकतो. नागरिकांनी लक्षणे दिसताच शासकीय दवाखान्यात तपासणी करून घ्यावी. संशयीत रूग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्र,नागरी आरोग्य केंद्र किंवा सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. कारागृहे, आश्रमशाळा याठिकाणीही सर्वे करण्यात येणार आहे.

कुष्ठरोग, क्षयरोग सर्वे करण्यासाठी आरोग्य कर्मचारी, आशा प्रत्येक घरी भेट देऊन तपासणी करणार आहेत. आशांच्या सोबतीला गावातील पुरूष स्वयंसेवकाची नेमणूक करण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, सदस्य यांनी नागरिकांना या मोहिमेबाबत माहिती द्यावी. शिवाय आरोग्य कर्मचारी, आशा यांना सहकार्य करावे, असे आवाहन स्वामी यांनी केले आहे.

सर्वे करणाऱ्या टीमने सर्वे योग्य पद्धतीने केला की नाही, याचे परीक्षण करावे. यासाठी सर्वे टीमचे प्रशिक्षण घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

मागील वर्षी कुष्ठरोगाचे 96 रूग्ण आढळून आले होते. त्यांच्यावर योग्य प्रकारे उपचार करण्यात आले आहेत. यावर्षी कुष्ठरोग आणि क्षयरोग सर्वेसाठी 2768 टीम तयार केल्या असून ही टीम रोज 25 घरांचा सर्वे करणार आहे. आरोग्य कर्मचारी, आशा यांना सर्वेबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. ध्वनीक्षेपक, दवंडी, हस्तपत्रिका, पोस्टर्स, बॅनर्सद्वारे प्रसिद्धीचे नियोजन आहे. शालेय प्रभात फेरी, प्रश्नमंजुषा, रांगोळी व निबंध स्पर्धा, खाजगी डॉक्टर कार्यशाळा, महिला मंडळ सभा असे कार्यक्रमही घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जाधव यांनी दिली.

कुष्ठरोग लक्षणे -

• त्वचेवर फिकट/लालसर बधीर चट्टा, त्याठिकाणी घाम न येणे.

• जाड, बधीर तेलकट/चकाकणारी त्वचा.

• त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळ्या जाड होणे.

• भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे.

• तळहातावर व तळपायावर मुंग्या येणे, बधीरपणा अथवा जखमा होणे.

• हाताची व पायाची बोटे वाकडी असणे. हात मनगटापासून किंवा पाय घोट्यापासून लुळा पडणे.

• त्वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे.

• हात व पायामध्ये अशक्तपणा जाणवणे, हातातून वस्तू गळून पडणे, चालताना पायातून चप्पल गळून पडणे. 

क्षयरोगाची लक्षणे -
• दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला आणि ताप

• वजनात लक्षणीय घट

• थुंकीवाटे रक्त येणे

• मानेवरील गाठ