'आधी तुमचा माज कमी करा'
अमरावती : दि.१० (प्रतिनिधी) अमरावतीच्या राजपेठ पोलीस ठाण्याच्या परिसरातील एक मुलगी हरवल्यानंतर पोलिसांवर आगपाखड करणाऱ्या खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात पोलिसांच्या कुटुंबीयांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत. नवनीत राणा यांनी हे प्रकरण लव्ह जिहाद असल्याचे सांगत आकांडतांडव केले होते. मात्र,संबंधित मुलगी समोर आल्यानंतर या दाव्यात तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर अमरावतीमधील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने नवनीत राणा यांना चांगलेच सुनावले. पोलिसांचा एवढाच राग करताय ना,मग तुम्ही खासदार आहात, केंद्रात तुमचे सरकार आहे, मग पोलिसांची सुरक्षा काढून टाका, कशाला पोलिसांची सुरक्षा घेता?' असा सवाल या कर्मचाऱ्याच्या पत्नीने नवनीत राणा यांना विचारला.
तुम्ही जिथे जाता तिकडे पोलीस सुरक्षा घेऊन फिरता. मात्र, तुम्हाला ही सुरक्षा घेण्याचा अधिकार नाही. तुमच्यासोबत जे पोलीस कर्मचारी फिरतात,ते शासनाचे आहेत. प्रत्येक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी त्याच्या स्थानापर्यंत मेहनत करून पोहोचला आहे. तुमच्यासारख्या लोकांना किराणा वाटून त्याने हे पद मिळवलेले नाही. आजपर्यंत प्रत्येकवेळी तुम्हाला सण-उत्सवांवेळी पोलीस संरक्षण लागते. तुम्ही पोलीस ठाण्यात वापरलेली भाषा योग्य नाही. आम्हाला माहिती आहे की, आमचे पती दिवसरात्र ड्युटी करतात, सणाच्या दिवशीही आमच्यासोबत नसतात आणि तुम्ही त्यांच्याविरोधात अशी भाषा वापरता. तुम्ही हा माज कमी करा. तुम्ही स्वत:ला लोकप्रतिनिधी म्हणवता. लोकप्रतिनिधीची भाषा अशी नसते,ते प्रेमाने बोलतात. पोलीस अधिकारी हे त्यांच्या मेहनतीने इथवर पोहोचले आहेत, त्यांच्या पदाला एक प्रतिष्ठा आहे,असे या पोलिसाच्या पत्नीन म्हटले.
नवनीत राणा नेहमीप्रमाणे हुज्जत घालायला गेल्या, पोलीस अधिकारी म्हणाला, 'यांना आधी बाहेर काढा'
यावेळी नवनीत राणा यांचा निषेध करण्यासाठी पोलीस कुटुंबीय मोठ्या प्रमाणावर रस्तावर उतरले होते. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी नवनीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच वारंवार पोलिसांबद्दल अपमानास्पद बोलणे हे त्यांनी टाळावं व त्यांनी तात्काळ पोलिसांची माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र पोलीस भरती संघटनेच्यावतीने करण्यात आली.