Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकार म्हणजे हप्ते गोळा करणारा नव्हे, तर समाजाचा जागरूक प्रहरी


आजच्या लोकशाही व्यवस्थेत पत्रकारितेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जाते. समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकार करीत असतो. त्यामुळे पत्रकार हा केवळ बातम्या देणारा व्यक्ती नसून समाजाचा जागरूक प्रहरी म्हणून ओळखला जातो.
पत्रकार म्हणजे समाजातील घटना,समस्या,अन्याय, भ्रष्टाचार,विकासकामे आणि लोकहिताच्या बाबींची माहिती गोळा करून ती सत्य आणि निष्पक्ष पद्धतीने लोकांसमोर मांडणारा व्यक्ती होय. 



पत्रकाराचे मुख्य कर्तव्य म्हणजे सत्याचा शोध घेणे आणि ते निर्भयपणे जनतेसमोर मांडणे. मात्र अलीकडच्या काळात काही ठिकाणी पत्रकारितेच्या नावाखाली गैरप्रकार होत असल्याचे चित्र दिसून येते. काही लोक पत्रकार असल्याचे भासवून दुकानदार, व्यावसायिक किंवा अधिकाऱ्यांकडून हप्ते मागण्याचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी समाजातून समोर येत आहेत. अशा प्रकारांमुळे खऱ्या पत्रकारितेची प्रतिमा मलिन होत आहे. समाजात असे गैरप्रकार करणारे लोक खरे पत्रकार नसून ते पत्रकारितेच्या पवित्र व्यवसायाला बदनाम करणारे आहेत. खरा पत्रकार हा प्रामाणिक,निडर आणि समाजहितासाठी काम करणारा असतो. तो कधीही कोणावर अन्याय्य दबाव टाकत नाही किंवा स्वतःच्या फायद्यासाठी पत्रकारितेचा वापर करत नाही.



पत्रकाराचे कार्य म्हणजे लोकांच्या समस्या शासन व प्रशासनापर्यंत पोहोचवणे,भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी काम करणे होय. त्यामुळे पत्रकारितेची खरी ओळख ही समाजसेवा आणि सत्य मांडण्याची जबाबदारी अशीच आहे.
आज गरज आहे ती प्रामाणिक आणि जबाबदार पत्रकारितेची. पत्रकारांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून सत्य,निष्पक्षता आणि नैतिक मूल्ये जपली तर समाजात पत्रकारितेचा सन्मान कायम राहील. पत्रकार हा हप्ते गोळा करणारा नव्हे,तर समाजाचा आवाज आणि लोकशाहीचा खरा रक्षक आहे.