Ticker

6/recent/ticker-posts

धक्कादायक ...पोलीस अधिक्षकांच्या बंगल्यात चोरीपोलीसांसमोर तपासाचं मोठं आव्हान


सोलापूर : दि.१८ (प्रतिनिधी)  सोलापूर शहर जिल्ह्याला हादरा देणारी धक्कादायक घटना शुक्रवारी सोलापुरात घडलीय. चोरट्यांनी पोलीस अधिक्षकांच्या शासकीय निवासस्थान परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी केलीय. त्या झाडांचं मूल्य स्पष्ट झालं नसलं तरी या चोरीनं पोलीस अधिक्षकांचा बंगला सुरक्षित राहिला नाही तर शहर आणि जिल्ह्यातील सामान्यांच्या सुरक्षिततेचं काय असा सवाल उभा केलाय. ह्या चंदन चोरीचा तपास म्हणजे शहर पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं केलंय.


हा थरारक प्रकार - घडलाय,सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या विकास नगरमधील निलगिरी बंगलोमध्ये ! ज्या बंगल्याच्या सुरक्षेसाठी २४ तास पोलीस बंदोबस्त नेमलेला असतो. या सुरक्षा व्यवस्थेला छेदत, चोरट्यांनी चंदनाची झाडे चोरून नेली. चोरट्यांनी केलेली चोरी अर्थातच पोलिसांच्या जागरूकतेसंबंधी सवाल निर्माण करणारा आहे. ही चोरी सोलापूर ग्रामीणच्या पाेलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या निवासस्थानातून झालीय. या निवासस्थानालगत सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस उप-आयुक्त डॉ. वैशाली कडूकर यांचं निवासस्थान आहे, हेही विशेषच !


पोलीस कॉन्स्टेबल - अभिजित शिंदे हे शुक्रवारी सकाळी निलगिरी बंगल्याच्या पाठीमागील लाईटचे बटण बंद करण्यासाठी गेले होते. त्यावेळी लॉनमध्ये असलेले एक मोठे चंदनाचे झाड कापलेले त्यांच्या दृष्टीस आले. त्याची पाहणी केली असता, चंदनाचे झाड तोडल्याचे व त्याचा बुंधा नसल्याचे त्यांना दिसून आले. पोलीस कॉन्स्टेबल शिंदे व त्यांचे सहकारी चंदनशिवे, संदीप हुलगे यांनी बंगल्यातील चंदनाच्या झाडांची पाहणी केली असता गेस्ट हाऊसच्या बाजूचे झाड व पाण्याच्या टाकीजवळील चंदनाचे झाड तुटलेले दिसले. त्याचाही बुंधा नसल्याचे दिसून आले.

यामुळे निलगिरी बंगलोमधील - तीन चंदनाचे झाड तोडून त्यांचा बुंधा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याबाबत शिंदे यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीय. या फिर्यादीवरून अज्ञात चोरावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यातील चंदनचोरीमुळे त्यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी असल्याचे उघड झाले आहे. पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यातून चंदन चोरीमुळे सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसंबंधी सवाल उभा राहिलायं.

या चंदनचोरीमुळे सोलापूर - शहर आणि जिल्ह्यात चोरट्यांचे मनोधैर्य वाढले असल्याचे दाखवून दिले आहे. या चंदन चोरीचा तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत. तरीसुद्धा या चोरीचा तपास पोलीसांसमोरील मोठं आव्हान मानलं जातयं.