Ticker

6/recent/ticker-posts

...अनधिकृत भाजीविक्रेत्यांवर कारवाई !


चार चाकी 5 गाड्यासह फळभाज्या,साहित्य केले जप्त !
 
महापालिका मंडई व अतिक्रमण विरोधी पथकाची संयुक्त कारवाई !

सोलापूर : दि.२७ (प्रतिनिधी)   स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पुनर्बांधणी केलेल्या राणी लक्ष्मीबाई मंडई येथे रस्त्यावरील अनधिकृत भाजी विक्रेत्यांवर शनिवारी दुपारी महापालिका मंडई विभाग व अतिक्रमण विरोधी पथकाने संयुक्त कारवाई केली. या कारवाईत
चार चाकी 5 गाड्यासह फळभाज्या ,साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे लगताचा रस्ता दुतर्फा वाहतुकीसाठी रिकामा झाला. या रस्त्याने मोकळा श्वास घेतला.स्मार्ट सिटी योजनेतून मध्यवर्ती ठिकाणी असलेली  राणी लक्ष्मीबाई मंडई नियोजनपूर्वक विकसित करण्यात आली. भाजी विक्रेत्यांसाठी या मंडईत व्यवस्थितपणे ओटे उपलब्ध करण्यात आले आहेत. मात्र  मंडई लगतच्या रस्त्यावर अनधिकृतपणे भाजी व फळ विक्रेते तसेच चार चाकी गाड्यांवर विक्री करणाऱ्यांविरोधात शनिवारी सकाळी 11 वाजता महापालिका मंडई विभाग व अतिक्रमण विरोधी पथकाने संयुक्त कारवाई सुरु केली.  पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.        

   
महापालिकेच्या या पथकास पाहताच विक्रेत्यांनी आपापला माल घेऊन पळापळ - करण्यास सुरुवात केली.रस्त्यावर अनधिकृतपणे  भाजी व फळ विक्री करू नका. मंडईमध्ये ओटे उपलब्ध करण्यात आले आहेत, तेथेच व्यवसाय करावा अन्यथा कारवाई करण्यात येईल असे आवाहन स्पीकर वरून महापालिका कर्मचारी राजेंद्र बाबरे करत होते. यादरम्यान चार चाकी 5 गाड्या ताब्यात घेण्यात आल्या तसेच भाजीपाला व इतर साहित्य ही जप्त करण्यात आले. येथील रस्त्यावर अनधिकृतपणे भाजी व फळ विक्री करणाऱ्याविरुद्ध सकाळी  11 ते 2 वाजेपर्यंत तब्बल 3 तास महापालिकेच्या पथकाने तळ ठोकून ही कारवाई केली. अखेर हा रस्ता दुतर्फा वाहतुकीसाठी खुला झाला.
       

महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या आदेशानुसार उपायुक्त विद्या पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मंडई विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी ही संयुक्त कारवाई केली.

रविवारी पुन्हा या ठिकाणी अतिक्रमण
 हटाव मोहीम राबविण्यात येणार - महापालिकेच्या मंडई व अतिक्रमणविरोधी पथकाच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सकाळी 3 तास राणी लक्ष्मीबाई मंडई येथे अनधिकृत भाजी व फळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये चार चाकी 5 गाड्या ताब्यात घेण्यात आल्या. इतर साहित्यही जप्त करण्यात आले. उद्या रविवारी व परवा पुन्हा या ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे ,अशी माहिती महापालिका मंडई विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी दिली.

सोमवारी 192 ओट्यांचा होणार लिलाव - सोमवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी राणी लक्ष्मीबाई मंडई येथील 192 ओट्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावात विक्रेत्यांनी सहभागी व्हावे. ओट्यावरच भाजी व फळ विक्री करावी. मंडईच्या आजूबाजूला, रस्त्यावर अनधिकृतपणे भाजी विक्री केल्यास महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येईल असे आवाहन महापालिका मंडई विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी केले.
      
या मोहिमेमध्ये महापालिका मंडई विभागाचे राजेंद्र बाबरे,शहापुरे,पिडगुळकर,आर.डी. कांबळे,खरटमल, खान,शिवशरण,तळभंडारे,अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे कोमुल यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते.