महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ अन्वये आदेश
सोलापूर : दि.३१ (प्रतिनिधी) यावर्षी 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर 2022 या कालावधीत गणेशोत्सव सर्वत्र साजरा होणार आहे. ग्रामीण (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) भागात गणेशोत्सव काळात मिरवणूक, जमावाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार सक्षम प्राधिकारी म्हणून संबंधित पोलीस अंमलदार, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना बहाल करण्याचा निर्णय पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी घेतला आहे. पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये खालीलप्रमाणे आदेश प्रारित केले आहेत.
दि.३१ ऑगस्ट २०२२ रोजीचे - ००.०० वा. पासून ते दि. ०९ सप्टेंबर २०२२ रोजीचे २४.०० वा. पर्यंत सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेस स्वाधिन असलेले अधिकारी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ मधील पोट कलम ‘अ’ ते ‘फ’ प्रमाणे खालील बाबतीत लेखी किंवा तोंडी आदेश देण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
पोलीस अधिकाऱ्यांना खालीलप्रमाणे अधिकार असतील.
रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणूकीतील - किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे, त्याची वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी याविषयी निर्देश देणे. अशा कोणत्याही मिरवणूका ह्या कोणत्या मार्गानी व कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहीत करणे. मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी व उपासनेच्या सर्व जागांच्या आसपास उपासनेचे वेळी व कोणत्याही रस्त्यावरून किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होवू न देणे. या सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये, घाटात किंवा घाटावर, सर्व धक्क्यावर किंवा धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानाच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये, देवालये आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणे. कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ किंवा सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ वाद्य वाजविण्याचे किंवा गाणी गाण्याचे किंवा ढोल, ताशे व इतर वाद्य वाजविण्याचे आणि शंख व इतर कर्कश वाद्य वाजविण्याचे विनियमन करणे त्यावर नियंत्रण करणे. कित्येक वेळा मशिदीत प्रार्थना चाललेली असते त्यावेळी वाद्य वाजविण्यास बंदी घातलेली असते. ही बंदी त्या समाजाच्या धार्मिक भावना दुखवू नये म्हणून घातलेली असते, म्हणजे शांततेसाठी ती घातलेली असते.
कोणत्याही सार्वजनिक जागेत - किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी ध्वनिक्षेपकाच्या ( लाऊड स्पिकर ) उपयोग करण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे. कर्कश लाऊड स्पिकर लावून लोकांना उपद्रव होण्याची शक्यता असते. त्याकरीता असे नियमन करणे आवश्यक असते. सक्षम प्राधिकाऱ्याने ह्या अधिनियमाची कलमे ३३, ३५, ३७ ते ४०, ४२, ४३ व ४५ या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे.
याबाबत कोणत्याही इसमाने सदरचा आदेश लागू - असेपर्यंत जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर हद्द वगळून) मिरवणूका, मोर्चे, निदर्शने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत ठाणेदार किंवा त्यापेक्षा वरिष्ठाकडून तारीख व वेळासंबंधी, सभेची जागा, मिरवणूका मार्ग, मोर्चे मार्ग त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणांचा अंतर्भाव निश्चित केल्याशिवाय आयोजित करू नये. तसेच संबंधीत पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे. जाहीर सभा, मिरवणूका, मोर्चे, पदयात्रेत समायोचित घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांततेस व सुव्यवस्थेस बाधा होवू शकते, अशा घोषणा देवू नये, असेही श्रीमती सातपुते यांनी आदेशात म्हटले आहे.