Ticker

6/recent/ticker-posts

मोहोळजवळ भरधाव कंटेनरची दुचाकीला पाठीमागून धडक; तरुणाचा मृत्यू, चुलते जखमी

कंटेनरच्या चाकाखाली अडकून तरुण फरफटत गेला; मोहोळ पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

सोलापूर : रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव व निष्काळजीपणे कंटेनर चालवून दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याचे चुलते जखमी झाले. ही घटना ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडल्याची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





नेमके काय घडले?
मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार,देविदास दिगंबर टेकाळे (वय ४०,रा.सावळेश्वर,ता.मोहोळ,जि. सोलापूर) यांनी या अपघाताबाबत फिर्याद दिली आहे.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, महादेव बाबुराव (रा.मेन रोड, हुनसगेरा,ता.हुमनाबाद,जि.बीदर,कर्नाटक) हा कंटेनर क्रमांक TS08UB4244 चालवत होता. त्याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात व निष्काळजीपणे कंटेनर चालवला. यावेळी सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकल क्रमांक MH13BM4199 ला कंटेनरने पाठीमागून धडक दिली.

या अपघातात मोटारसायकलवरील हरिदास ऊर्फ हरी गजेंद्र टेकाळे हे रस्त्यावर पडल्याने किरकोळ जखमी झाले. तर प्रशांत टेकाळे हे कंटेनरच्या समोरील डाव्या बाजूच्या चाकाखाली अडकले. ते सुमारे २५ फूट फरफटत गेल्याने त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर प्रशांत टेकाळे यांना उपचारासाठी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तक्रारीतील माहितीनुसार,उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.





कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९४३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २८१, १२५(ब), १०६(१), १२५(अ) तसेच मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती फिर्यादीच्या नोंदीत नमूद आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार एच.सी.२७२ माने करीत आहेत,तर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही एच.सी. २८७ चव्हाण यांनी केली आहे. अपघाताच्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.