Ticker

6/recent/ticker-posts

मोहोळमध्ये आठ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप; सात लाख रुपये मागितल्याच्या वादातून धमकी दिल्याची फिर्याद


सोलापूर : उसने दिलेले सात लाख रुपये परत मागण्यासाठी गेलेल्या महिलेच्या आठ वर्षांच्या मुलीसोबत अनुचित कृत्य केल्याचा तसेच महिलेला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप मोहोळ येथील पिंटू उर्फ दत्तात्रेय शेगर याच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात ३ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,संबंधित महिला ३० जून २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आपली आठ वर्षांची मुलगी आणि सासू यांच्यासोबत नेताजी शाळेजवळ, मोहोळ येथील आरोपीच्या घरी गेली होती. आरोपीला यापूर्वी उसने दिलेले सात लाख रुपये आर्थिक अडचणीमुळे परत मागितले असता, त्याने पैसे दुसऱ्या दिवशी देण्याचे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.



त्यानंतर रात्री आठच्या सुमारास महिला आणि तिची सासू काही वेळासाठी बाहेर गेल्या होत्या. त्या परत आल्यानंतर मुलगी रडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. रडण्याचे कारण विचारले असता, आरोपीने मांडीवर घेऊन तिच्या कपड्यांमध्ये हात घालून तिच्या गुप्तांगाला स्पर्श केल्याचे मुलीने सांगितल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
याबाबत आरोपीला जाब विचारला असता,त्याने शिवीगाळ करून महिलेला ढकलून दिले, तसेच पुन्हा पैसे मागण्यासाठी आल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आणि पोलिसांत तक्रार केल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.


आरोपीच्या धमकीमुळे सुरुवातीला तक्रार दिली नसल्याचे महिलेने सांगितले. त्यानंतर नातेवाइकांशी चर्चा करून तिने ३ ऑक्टोबर रोजी मोहोळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू - या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९३३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४, ७६, ३५१(२), ३५२ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) कलम ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया PSI शेख यांनी केली असून,पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.