मोहोळ येथील गुन्हा; सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर कोल्हापूर खंडपीठात धाव
कोल्हापूर/मोहोळ : अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपांशी संबंधित पोक्सो कायद्यांतर्गत दाखल प्रकरणात आरोपी उदयसिंह गायकवाड (वय २३, रा. पेनूर, ता. मोहोळ) यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती अश्विन बोभे यांनी दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी हा आदेश दिल्याची माहिती देण्यात आली आहे.
या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५६३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १३७(२), ६४, ६४(२)(m) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ४, ६, ८ व १२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नेमके प्रकरण काय?
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार,दि. ७ जून २०२६ रोजी आरोपीने पीडिता अल्पवयीन असल्याची माहिती असूनही तिला तिच्या राहत्या घरातून सोबत नेल्याचा आरोप आहे. तसेच तिला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीने केला होता. या तक्रारीच्या आधारे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
सत्र न्यायालयात अर्ज फेटाळला - आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र,न्यायालयाने तो फेटाळला. त्यानंतर आरोपीने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला.
बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य - उच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने केलेल्या युक्तिवादात आरोपी आणि पीडिता एकमेकांना ओळखत असून त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच पीडितेने आरोपीविरुद्ध धमकी किंवा मारहाणीची तक्रार केली नसल्याचा मुद्दाही मांडण्यात आला. उपलब्ध माहितीनुसार, न्यायालयाने हे मुद्दे विचारात घेत आरोपीला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला.
दोन्ही बाजूंच्या वकिलांनी पाहिले काम - आरोपीतर्फे ॲड. कदीर औटी,ॲड.सौरभ तांदळे,ॲड.शिवरत्न वाघ, ॲड.वैभव बोंगे,ॲड.प्रदीप गायकवाड,ॲड.मोहीम पठाण, ॲड.ओंकार फडतरे,ॲड.रोहित थोरात,ॲड.सलामत पटेल आणि ॲड.अजय वाघमारे यांनी काम पाहिले. सरकारतर्फे ॲड.सी.डी.माळी यांनी बाजू मांडली.
