सोलापूर : क्रीडा व युवक संचालनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा कार्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोंडी तसेच विजयसिंह मोहिते-पाटील कनिष्ठ महाविद्यालय, कोंडी येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सॉफ्ट टेनिस, ॲथलेटिक्स आणि तलवारबाजी या क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली असून, एकूण १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सॉफ्ट टेनिसमध्ये विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
सोलापूर येथील हरीभाई देवकरण प्रशालेत पार पडलेल्या जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत संस्थेच्या विद्यार्थ्यांनी विविध वयोगटांत यश मिळवले.
यामध्ये १४ वर्षांखालील मुलींच्या गटात कु. समृद्धी धर्मराज नन्नवरे हिने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात कु. दर्शना अतुल देशमुख हिने प्रथम क्रमांक मिळवला. १९ वर्षांखालील मुलींच्या गटात कु. श्रद्धा धर्मराज नन्नवरे हिने द्वितीय,तर कु.अक्षरा दिनकर साठे हिने तृतीय क्रमांक मिळवला.
१९ वर्षांखालील मुलांच्या गटात आदर्श ज्योतिबा गुंड याने प्रथम, युद्धाजीत दत्तात्रय भोसले याने द्वितीय, तर अथर्व रोहित चौगुले याने चौथा क्रमांक मिळवला. या स्पर्धेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर लक्षवेधी कामगिरी केली.
ॲथलेटिक्समध्येही विद्यार्थ्यांचा दमदार ठसा
पंढरपूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत अथर्व संतोष गायकवाड याने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम, तर २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.
आकांक्षा अनिल शिंदे हिने गोळाफेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी निवड मिळवली. कार्तिक नागनाथ दळवे याने भालाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेत स्थान निश्चित केले.
तलवारबाजी स्पर्धेतही यश
तलवारबाजी स्पर्धेत कु. सफा एजाज शेख हिने १७ वर्षांखालील गटातील ईपी प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला. तर कु. शगुन शिवाप्पा राठोड हिने १९ वर्षांखालील गटातील फॉईल प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावून संस्थेच्या यशात भर घातली.
मार्गदर्शन आणि अभिनंदन
या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक दिलीप भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री गणेश नीळ, प्राचार्य सुषमा नीळ, मुख्याध्यापिका अर्चना औरादे आणि प्रतिक्षा खुणे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून आगामी विभागीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण सरावाला, मेहनतीला आणि योग्य मार्गदर्शनाला मिळालेल्या यशामुळे जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीला नवी दिशा मिळाली आहे. विभागीय स्पर्धेतही विद्यार्थी उत्तम कामगिरी करून संस्थेचा नावलौकिक वाढवतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
