Ticker

6/recent/ticker-posts

शिवरायांची अष्टक्रांती म्हणजे स्वराज्य ते सुराज्याचा प्रेरणादायी प्रवास!

  
ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांचे प्रतिपादन

सोलापूर : सामान्य माणसांमधून असामान्य आत्मविश्वास निर्माण करून आपल्या कर्तृत्वाने इतिहासाला नवी दिशा देणारे युगपुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. विचारांमध्ये क्रांती,कृतीमध्ये दूरदृष्टी आणि ध्येयामध्ये स्वराज्याची प्रेरणा असलेल्या शिवरायांनी केवळ स्वराज्याची स्थापना केली नाही,तर त्याचे सुराज्यात रूपांतर करण्याचा आदर्श घालून दिला. कृषी,अर्थव्यवस्था,सामाजिक समरसता, युद्धनीती,दुर्गनिर्मिती,आरमार आणि संस्कृती अशा विविध क्षेत्रांत त्यांनी परिवर्तन घडविले.त्यामुळे शिवरायांची अष्टक्रांती म्हणजे स्वराज्य ते सुराज्याचा प्रेरणादायी प्रवास असल्याचे गौरवोद्गार पुण्याचे ज्येष्ठ इतिहास संशोधक व शिवचरित्राचे अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी केले.

हुतात्मा स्मारक येथे सिद्धेश्वर बँक सेवक सांस्कृतिक मंडळाच्यावतीने आयोजित ४४ व्या शारदोत्सवातील व्याख्यानमालेच्या चौथ्या पुष्पात ‘छत्रपती शिवरायांची अष्टक्रांती’ या विषयावर बलकवडे बोलत होते. प्रारंभी   बँकेचे माजी अध्यक्ष  प्रकाश वाले व ज्येष्ठ संचालक अ‍ॅड. एम.के.पाटील,यांच्या हस्ते बलकवडे यांचा सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी बँकेचे सीईओ संजय घाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.बलकवडे म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा अभ्यास करताना केवळ त्यांच्या पराक्रमाचा आणि युद्धांचा विचार करून चालणार नाही. त्यांनी तत्कालीन परिस्थितीत समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांत घडवून आणलेल्या बदलांचा व्यापक दृष्टिकोनातून विचार करणे आवश्यक आहे. अनेक शतकांच्या परकीय सत्तांच्या पार्श्वभूमीवर शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली. 

अठरापगड जातींना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्याचा पाया मजबूत केला. समाजातील विविध घटकांना एकत्र आणत स्वराज्याच्या निर्मितीला व्यापक स्वरूप दिले.शिवरायांच्या कार्याचा केंद्रबिंदू रयतेचे कल्याण हा होता. कृषी क्षेत्रातील सुधारणा,आर्थिक व्यवहारांना चालना आणि सामान्य माणसाला सक्षम करण्याच्या प्रयत्नांतून त्यांच्या राज्यकारभाराची लोकाभिमुखता दिसून येते. कृषी क्षेत्रातील बदलांतून आर्थिक परिवर्तन,तर आर्थिक परिवर्तनातून सामाजिक समरसतेला बळ मिळाले. समाजातील विविध घटकांना एकत्र आणणारी ही प्रक्रिया स्वराज्याच्या बळकटीसाठी महत्त्वाची ठरली,असे बलकवडे यांनी सांगितले. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा वेध घेताना शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. प्रतिकूल राजकीय परिस्थितीत शहाजीराजांनी केलेला संघर्ष आणि दक्षिण भारतातील त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे. जिजाऊंच्या संस्कारांनी शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाला आणि स्वराज्याच्या ध्येयाला दिशा दिली. या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा अभ्यास केल्याशिवाय शिवरायांचे कार्य समजून घेता येणार नाही,असे बलकवडे यांनी नमूद केले. या कार्यक्रमास  सिद्धेश्वर बँकेचे मार्गदर्शक राजशेखर शिवदारे,अध्यक्ष नरेंद्र गंभीरे यांच्यासह पदाधिकारी,आजी-माजी संचालक आणि इतिहासप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रमोद नारायणकर यांनी केले.

चौकट -शिवरायांमध्ये रामाचे चारित्र्य,कृष्णाच्या युद्धनीतीचा  संगम! छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा, भौगोलिक परिस्थितीचा प्रभावी वापर आणि शत्रूच्या मानसिकतेचा अभ्यास अशा युद्धतंत्रांच्या आधारे बलाढ्य सत्तांशी यशस्वी संघर्ष केला. सह्याद्रीतील किल्ल्यांचे सामर्थ्य वाढविण्यासोबतच सागरी सीमांच्या संरक्षणासाठी आरमार उभारले. जलदुर्गांच्या माध्यमातून सागरी सुरक्षेला बळ दिले. प्रभू श्रीरामांचे चारित्र्य आणि भगवान श्रीकृष्णांची युद्धनीती यांचा अनोखा संगम छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात पाहायला मिळतो,असे ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी सांगितले.