सोलापूर : महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा 51 वा वाढदिवस सर्वत्र साजरा होतोय. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरात विविध ठिकाणी शुभेच्छा देणारे फलक,बॅनर आणि जाहिरातींची चर्चा सुरू असतानाच,माध्यमांना दिल्या जाणाऱ्या जाहिरातींच्या मुद्द्यावरून शहरातील प्रसारमाध्यमांमध्ये नाराजीची भावना व्यक्त होत असल्याची चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नावाचा आणि राजकीय संपर्काचा आधार घेत काही स्थानिक नेतेमंडळींनी आपला राजकीय प्रभाव वाढविल्याची, तसेच या माध्यमातून आर्थिक व सामाजिक प्रतिष्ठा मिळविल्याची चर्चा काही वर्तुळांत होत आहे. मात्र,या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळालेला नसल्याने संबंधित दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी होणे वेगळा मुद्दा आहे.
वाढदिवसाच्या जाहिरातींमध्ये माध्यमांना डावलल्याची चर्चा - वाढदिवस हा कोणत्याही लोकप्रतिनिधीप्रती शुभेच्छा व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा प्रसंग असतो. अशा वेळी वृत्तपत्रे,न्यूज पोर्टल,डिजिटल माध्यमे आणि स्थानिक वृत्तवाहिन्या यांच्यामार्फत शुभेच्छा आणि जाहिराती प्रसिद्ध होण्याचा आजवरचा प्रघात होता. मात्र,यंदा पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त जाहिरातींचे नियोजन करताना सोलापूर शहरातील काही माध्यमांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याची चर्चा माध्यम क्षेत्रातील काही घटकांमध्ये होत असल्याचे बोललं जात आहे.
काही स्थानिक नेतेमंडळी पालकमंत्र्यांच्या नावाचा वापर करून आपली राजकीय जवळीक दाखवितात; मात्र अशा महत्त्वाच्या प्रसंगी माध्यमांशी समन्वय साधण्याबाबत उदासीनता दाखविली जाते का,असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.
माध्यमांच्या योगदानाची दखल घेण्याची अपेक्षा - लोकशाही व्यवस्थेत प्रसारमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शासनाच्या योजना,विकासकामे, लोकप्रतिनिधींचे उपक्रम आणि जनतेच्या समस्या नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम छोटी-मोठी माध्यमं ज्यांच्या-त्यांच्या परीनं सातत्याने करत असतातत. त्यामुळे सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या राजकीय नेतेमंडळींनी माध्यमांशी संवाद आणि समन्वय राखणे अपेक्षित असते.
पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना जाहिरातींचे वाटप कोणत्या निकषांवर केले जाते,स्थानिक माध्यमांना समान संधी मिळते का आणि माध्यम क्षेत्रातील सर्व घटकांचा विचार केला जातो का,या मुद्द्यांवर चर्चा होणे स्वाभाविक आहे.
पालकमंत्री यांची भूमिका काय?
या संपूर्ण प्रकरणात पालकमंत्री जयकुमार गोरे यांची किंवा संबंधित स्थानिक नेतेमंडळींची अधिकृत भूमिका अद्यापसमोर आलेली नाही. तसेच जाहिरातींचे वाटप नेमके कशा पद्धतीने झाले,याबाबतही ठोस माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीवर थेट आरोप करण्याऐवजी वस्तुस्थिती स्पष्ट होणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान,पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत असताना माध्यमांना जाहिराती देण्याच्या मुद्द्यावरून सुरू असलेली ही चर्चा सोलापूरच्या राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रात लक्षवेधी ठरत आहे. या चर्चेवर संबंधितांकडून काय स्पष्टीकरण दिले जाते आणि माध्यमांच्या नाराजीची दखल घेतली जाते का,याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
