Ticker

6/recent/ticker-posts

चोरांचा कर्दनकाळ! गुन्हेगारांची शिजत नाही डाळ! वैरागचे पोलीस निरीक्षक ॲड.अमूल कादबाने यांचा अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा


वाढदिवसाचा दिखावा टाळत वृक्षारोपणाचा संदेश; मोगऱ्याचे रोपटे देऊन केला सत्कार, १०० मोगऱ्याची झाडे वाटप करण्याचा मानस!

सोलापूर : गुन्हेगारांवर कायद्याचा धाक, सर्वसामान्य नागरिकांशी आपुलकीची नाळ आणि कर्तव्य बजावताना कोणतीही तडजोड नाही, अशी ओळख निर्माण करणारे वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ॲड. अमूल कादबाने यांचा वाढदिवस अनोख्या आणि समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त हार-तुरे, मोठा खर्च आणि दिखाव्याला फाटा देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यावर भर देण्यात आला.

शांत, संयमी आणि मितभाषी स्वभावामुळे परिचित असलेले पोलीस निरीक्षक ॲड.अमूल कादबाने हे गुन्हेगारांविरुद्ध कायद्याच्या चौकटीत कठोर भूमिका घेतात, तर सर्वसामान्य नागरिकांशी आपुलकीने संवाद साधतात. आबालवृद्ध आणि महिलांमध्येही आपुलकीची भावना निर्माण करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांकडून सांगण्यात येते. अन्याय करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करताना कायद्यापुढे सर्व समान असल्याचा संदेश देण्यावर त्यांचा भर असतो.



गुन्हेगारांविरुद्ध कठोर,नागरिकांशी आपुलकीचे नाते!
कर्तव्याप्रती निष्ठा आणि जनतेशी संवाद साधण्याची पद्धत यामुळे पोलीस निरीक्षक ॲड.अमूल कादबाने यांच्याविषयी परिसरात चर्चा होत असते. बाहेरून शांत दिसणारे,मात्र गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका घेणारे अधिकारी, अशी त्यांची प्रतिमा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जाते. कायद्याचा धाक कायम ठेवतानाच सामान्य माणसाच्या अडचणी समजून घेण्याची भूमिका त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य मानली जाते.

वाढदिवसाला खर्च नको,गावोगावी झाडे लावा!
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी आपला कामधंदा सोडून येण्याची गरज नाही. त्याऐवजी प्रत्येकाने आपल्या गावात एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, हीच माझ्यासाठी वाढदिवसाची खरी भेट असेल,असा पर्यावरणपूरक संदेश पोलीस निरीक्षक ॲड.अमूल कादबाने यांनी दिला.





या प्रसंगी औपचारिक सत्कारासाठी गणेश मसाळ, पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव तसेच पोलीस कर्मचारी उमेश कंगले आणि शिंगाडे यांच्या हस्ते त्यांना मोगऱ्याचे रोपटे भेट देण्यात आले. निरागसता, निस्वार्थी प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या मोगऱ्याच्या रोपट्याच्या माध्यमातून निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यात आला.


शंभर मोगऱ्याची रोपे वाटप करण्याचा मानस!
पर्यावरण संवर्धनासोबतच समाजात शांतता, प्रेमभावना आणि आपुलकी वाढावी, या उद्देशाने मोगऱ्याची १०० रोपे वाटप करण्याचा मानस पोलीस निरीक्षक ॲड. अमूल कादबाने यांनी व्यक्त केला. वाढदिवस साजरा करताना केवळ शुभेच्छा आणि सत्कारापुरते मर्यादित न राहता समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची भावना या उपक्रमातून व्यक्त झाली.





दिखावा नाही,निसर्ग संवर्धनाचा ध्यास!
वाढदिवस म्हटला की मोठा खर्च,सत्कार समारंभ आणि उत्सवाचा थाट, असे चित्र अनेकदा पाहायला मिळते. मात्र, वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपणाचा संदेश देत पर्यावरणाप्रती जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

“वाढदिवसाचा थाट नाही,दिखाव्याचा घाट नाही; समाजसेवेची भावना आणि निसर्ग संवर्धनाचा ध्यास-हाच खऱ्या अर्थाने आदर्श वाढदिवस!” असा सकारात्मक संदेश वैरागमधील या उपक्रमातून देण्यात आला.