कुमठा नाका येथे व्वा संघटनेचा उपक्रम; महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन
सोलापूर : वंचित व गरजू एकल महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने व्वा संघटनेच्या वतीने ‘एकल महिला धोरणा’अंतर्गत नाव नोंदणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. सोलापूर शहरातील कुमठा नाका येथे सोलापूर महानगरपालिकेच्या UCD विभागाच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराला परिसरातील तसेच आसपासच्या प्रभागांमधील एकल महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळपास २०० महिलांनी उपस्थित राहून आवश्यक फॉर्म भरून नाव नोंदणी केली. यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे वसीम शेख यांचे सहकार्य लाभले.
एकल महिलांना स्वावलंबी आणि सशक्त बनविण्यासाठी तसेच त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी या शिबिराच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. गरजू महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळावी आणि त्यांना योजनांचा लाभ घेता यावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
“महिलांना स्वावलंबी आणि सशक्त बनवणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. या शिबिराच्या माध्यमातून अनेक गरजू महिलांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार आहे. महिलांनी दिलेल्या भक्कम पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. त्यांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर राहू,” असे व्वा संघटनेच्या अध्यक्षा व शिबिराच्या संयोजिका विद्या लोलगे यांनी सांगितले.
यावेळी अफ्रिन पटेल, वैशाली देशपांडे, शहाना कुरेशी, शोभा गायकवाड, मार्था आसादे, नम्रता जाधव आदी उपस्थित होते. शिबिराच्या माध्यमातून मोठ्या संख्येने महिलांनी नाव नोंदणी केल्याने या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
