Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपुरात बालसंरक्षणासाठी प्रशासन आणि वारकरी संप्रदायाचा सकारात्मक संवाद


ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराजांसह विविध मठांच्या प्रमुख विश्वस्तांसोबत बैठक; बालहक्क,POCSO व बाल न्याय कायद्याबाबत मार्गदर्शन

पंढरपूर : पंढरपूर शहरातील बालकांचे शिक्षण,संस्कार तसेच वारकरी संप्रदायाच्या परंपरेचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने कार्यरत विविध मठांचे प्रमुख विश्वस्त आणि प्रशासन यांच्यात अत्यंत सकारात्मक बैठक पार पडली. अखिल भाविक वारकरी संप्रदाय मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत बालकांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या हक्कांच्या संरक्षणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान बालकांचे अधिकार,बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015, तसेच POCSO कायदा, 2012 याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. बालकांसोबत काम करताना कोणती काळजी घ्यावी, बालकांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, तसेच बालकांच्या संदर्भातील कायदेशीर जबाबदाऱ्या यावरही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे प्रमुख तीर्थक्षेत्र असून शहरातील विविध मठ,संस्था आणि धार्मिक केंद्रांमध्ये बालकांचे शिक्षण व संस्कार घडविण्याचे कार्य केले जाते. या पार्श्वभूमीवर बालकांना सुरक्षित,सन्मानपूर्वक आणि हक्काधारित वातावरण मिळावे,यासाठी प्रशासन व संबंधित संस्थांमध्ये समन्वय असणे आवश्यक असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले.



यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अविनाश मगर,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीन थोरात,जिल्हा परिविक्षा अधिकारी जाधवर तसेच चाइल्ड हेल्पलाइनचे सुपरवायझर विश्वा वाघमारे उपस्थित होते.

वारकरी संप्रदायाची सेवा,संस्कार आणि मानवतेची परंपरा यांना बालकांची सुरक्षितता,शिक्षण,सन्मान आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणाची जोड मिळणे ही काळाची गरज आहे, असा सूर या बैठकीत व्यक्त झाला.

या सकारात्मक संवादामुळे प्रशासन,वारकरी संप्रदायातील विविध संस्था आणि समाज यांच्यात बालकांच्या हितासाठी अधिक प्रभावी समन्वय निर्माण होण्यास मदत होईल,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.