Ticker

6/recent/ticker-posts

विमानसेवा बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे ९ सप्टेंबर रोजी बैठकीचे आयोजन



इंधन दरवाढीचा फटका; स्टार एअरची सोलापूर-मुंबई विमानसेवा बंद

वाढत्या एटीएफ दरामुळे सेवा सुरू ठेवणे आर्थिकदृष्ट्या अशक्य; देशभरात सोलापूर ते मुंबई सह ८ हवाई मार्गावरील विमानसेवा बंद

सोलापूर ते मुंबई विमानसेवा बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे ९ सप्टेंबर रोजी बैठकीचे आयोजन

सोलापूर : स्टार विमान कंपनीकडून सोलापूर ते मुंबई विमान सेवा बंद केल्या बाबतचे पत्र जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी स्टार एयर विमान कंपनीला विचारणा केली असता त्यांच्याकडून खालील प्रमाणे उत्तर प्राप्त झालेले आहे.

स्टार एअर कंपनीचा खुलासा - विमान इंधनाच्या (एटीएफ) किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू ठेवणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे कारण देत स्टार एअरने ही सेवा बंद केली आहे. सोलापूर ते मुंबई विमान सेवेसह नांदेड ते मुंबई,बेळगाव ते मुंबई तसेच गुजरात ओरिसा या राज्यातूनही विमान सेवा बंद करण्यात आलेल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून विमान वाहतूक क्षेत्राला विविध अडचणींचा सामना करावा लागत असून,वाढत्या इंधन दराचा मोठा फटका विमान कंपन्यांना बसत आहे.



फेब्रुवारी २०२६ मध्ये विमान इंधनाची किंमत सुमारे ६० रुपये प्रतिलिटर होती. सप्टेंबर २०२६ मध्ये ही किंमत वाढून सुमारे १२२ रुपये प्रतिलिटर झाली आहे. त्यामुळे तुलनेने छोटी विमान कंपनी असलेल्या स्टार एअरला वाढत्या इंधन खर्चाचा मोठा आर्थिक भार सहन करावा लागत आहे.





सोलापूर-मुंबई विमानसेवेमुळे कंपनीला प्रति महिन्याला मोठे नुकसान होत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. राज्य शासनाकडून कंपनीला विविध माध्यमातून मदत करण्यात आली असून,फंडिंग निधीत वाढ केल्यामुळे काही प्रमाणात नुकसान भरून काढण्यास मदत झाली. मात्र, इंधनाच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीमुळे सेवा सुरू ठेवणे आर्थिकदृष्ट्या अत्यंत जिकिरीचे झाले आहे.





या वाढत्या खर्चामुळे सोलापूर-मुंबई विमानसेवा सध्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती स्टार एअरकडून देण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूरच्या विमानसेवेला पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा मोठा फटका बसला आहे. 

मुंबई येथे ९ सप्टेंबर रोजी बेैठक - सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा स्टार एयरने बंद केल्याने त्या अनुषंगाने मुंबई येथे ९ सप्टेंबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या बैठकीमध्ये विमान सेवा पुन्हा सुरू करण्याच्या अनुषंगाने सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे,असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आलेले आहे.