मुंबईची विमानफेरी रद्द; Fly91च्या गोवा-हैदराबाद सेवाही अनिश्चित -तिरुपती सेवेला अद्याप मुहूर्त नाही; “आश्वासनांवर नव्हे, कृतीवर सोलापूरचा विकास हवा” : सोलापूर विकास मंच
सोलापूर : सोलापूरच्या औद्योगिक,व्यावसायिक आणि आर्थिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली विमानसेवा पुन्हा एकदा अनिश्चिततेच्या गर्तेत सापडली आहे. स्टार एअरलाईन्सची सोलापूर-मुंबई विमानफेरी रद्द होणे, Fly91ची सोलापूर-गोवा व सोलापूर-हैदराबाद सेवा नियमितपणे पूर्ववत न होणे आणि सोलापूर–तिरुपती थेट विमानसेवा अद्याप सुरू न होणे,यामुळे सोलापूरकरांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
सोलापूर विकास मंचाने विमानसेवेच्या या परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त करत “केवळ घोषणा आणि आश्वासनांच्या जोरावर सोलापूरचा विकास होणार नाही,” असा स्पष्ट इशारा प्रशासन व लोकप्रतिनिधींना दिला आहे.
विमानसेवा म्हणजे विकासाची जीवनवाहिनी - विमानसेवा ही केवळ प्रवाशांच्या प्रवासाची सुविधा नसून शहराच्या उद्योग,व्यापार,आयटी,पर्यटन,गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीशी थेट जोडलेली पायाभूत सुविधा आहे. एखाद्या गुंतवणूकदाराला किंवा मोठ्या कंपनीच्या अधिकाऱ्याला सोलापूरला येण्यासाठी नियमित विमानसेवेवर विश्वास ठेवता येत नसेल, तर नवीन गुंतवणूक सोलापूरमध्ये आणणे आव्हानात्मक ठरणार असल्याचे मंचाने म्हटले आहे.
सोलापूरमध्ये आयटी पार्क,नवीन उद्योग,स्टार्टअप्स आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या चर्चा सुरू असताना शहराची विमानसेवा मात्र अनिश्चित राहणे हा मोठा विरोधाभास असल्याची टीका मंचाने केली. मुंबई,गोवा,हैदराबाद सेवांबाबत प्रश्नचिन्ह
स्टार एअरलाईन्सची सोलापूर-मुंबई विमानसेवा रद्द झाल्याने प्रवाशांना मोठा फटका बसत आहे.
त्याचबरोबर Fly91कडून सोलापूर–गोवा आणि सोलापूर-हैदराबाद विमानसेवा सुरू करण्याबाबत घोषणा झाल्या असल्या तरी या सेवा नियमितपणे सुरू राहण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
तर सोलापूर-तिरुपती थेट विमानसेवा सुरू करण्याबाबत अनेकदा आश्वासने देण्यात आली; मात्र प्रत्यक्षात ही सेवा अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे आता घोषणा नकोत, तर विमानसेवा सुरू होण्याची निश्चित तारीख आणि वेळापत्रक जाहीर करावे,अशी मागणी सोलापूर विकास मंचाने केली आहे.
होटगी रोड विमानतळ सक्षम करण्याऐवजी बोरामणीचा आग्रह का? विमानसेवेचा प्रश्न गंभीर असताना बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मुद्दा सातत्याने पुढे आणला जात असल्याबद्दलही सोलापूर विकास मंचाने प्रश्न उपस्थित केला आहे.
मंचाच्या मते, नवीन विमानतळाच्या चर्चेबरोबरच विद्यमान होटगी रोड विमानतळाचा पूर्ण क्षमतेने विकास करण्याचा पर्याय गांभीर्याने तपासला पाहिजे. होटगी रोड विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा, आवश्यक तांत्रिक साधने आणि इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी किती खर्च येईल, याचा स्वतंत्र तांत्रिक व आर्थिक अभ्यास जनतेसमोर मांडावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुमारे १,६०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे जमीन अधिग्रहण, धावपट्टी, टर्मिनल, एअर ट्रॅफिक कंट्रोल, नेव्हिगेशन, सुरक्षा, कार्गो आणि इतर सुविधांसाठी किती खर्च प्रस्तावित आहे, याचा सविस्तर तपशील शासनाने जाहीर करावा, अशी मागणी मंचाने केली आहे.
“सोलापूरला घोषणांचा नव्हे, कृतीचा विकास हवा”
सोलापूरला आयटी पार्क, उद्योग, रोजगार आणि पर्यटन विकासाच्या दिशेने पुढे न्यायचे असेल, तर विश्वासार्ह हवाई कनेक्टिव्हिटी अत्यावश्यक असल्याचे मंचाने स्पष्ट केले.
“आज विमानफेऱ्या रद्द होत आहेत; उद्या गुंतवणूकदारांच्या भेटी आणि उद्योगांचे निर्णय रद्द झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार? सोलापूरच्या तरुणांना रोजगार हवा असेल तर सोलापूरला विश्वासार्ह हवाई कनेक्टिव्हिटी हवीच,” असा सवाल सोलापूर विकास मंचाने उपस्थित केला.
सोलापूर विकास मंचाच्या प्रमुख मागण्या स्टार एअरलाईन्सची सोलापूर-मुंबई विमानसेवा नियमित व विश्वासार्ह करावी.
Fly91ची सोलापूर-गोवा व सोलापूर–हैदराबाद सेवा तातडीने नियमित करावी.
सोलापूर-तिरुपती थेट विमानसेवा सुरू करण्याची निश्चित तारीख जाहीर करावी.
होटगी रोड विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
होटगी रोड विमानतळाचा विकास आणि बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा स्वतंत्र तुलनात्मक तांत्रिक-आर्थिक अहवाल जाहीर करावा.
बोरामणी विमानतळासाठी प्रस्तावित १,६०० कोटी रुपयांच्या खर्चाचा सविस्तर तपशील जनतेसमोर ठेवावा.
विमानसेवेला उद्योग,आयटी पार्क,पर्यटन आणि रोजगारनिर्मितीशी जोडणारा दीर्घकालीन हवाई कनेक्टिव्हिटी आराखडा तयार करावा.
“विमानतळाच्या घोषणा नकोत; नियमित विमानसेवा हवी!”
“सोलापूरला विमानतळाच्या घोषणा नकोत; सोलापूरला नियमित विमानसेवा हवी. आश्वासनांपेक्षा कृती आणि प्रसिद्धीपेक्षा सोलापूरचा प्रत्यक्ष विकास - हीच आता सोलापूरकरांची अपेक्षा आहे,” असा स्पष्ट संदेश सोलापूर विकास मंचाने दिला आहे.
