Ticker

6/recent/ticker-posts

एसआयआर अंतर्गत मतदार यादीत प्रत्येक पात्र मतदाराच्या समावेशासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे - विभागीय आयुक्त शितल तेली-उगले


अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध होणार

सोलापूर : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यासह इतर 13 राज्यांमध्ये सुरू केलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल परीक्षण कार्यक्रम अंतर्गत मतदार याद्यांचे शुद्धीकरण केले जात आहे. मतदार यादीत प्रत्येक पात्र नागरिकाचा समावेश करणे तसेच अपात्र नागरिकाला मतदार यादीतून वगळणे हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. तरी सोलापूर जिल्ह्याच्या मतदार यादीत एसआयआर अंतर्गत प्रत्येक पात्र नागरिकाचा समावेश होण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे,असे आवाहन मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी केले. 
      
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत राजकीय पक्षाच्या प्रतिनिधी सोबत आयोजित आढावा बैठकीत तेली उगले मार्गदर्शन करत होत्या. जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन,अप्पर आयुक्त तथा मतदार यादीचे नोडल अधिकारी तुषार ठोंबरे,निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील,महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी लक्ष्मण कसेकर,यांच्यासह सर्व मतदार नोंदणी अधिकारी तसेच प्रमुख राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
    
मतदार नोंदणी निरीक्षक तेली उगले पुढे म्हणाल्या की,सोलापूर जिल्ह्याची मतदार यादी अंतिम करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे. राजकीय पक्षांचे बीएलए हे बूथ लेवल ऑफिसर यांना मदत करतच आहेत. तसेच राजकीय पक्षांनी ज्यांची नावे सध्याच्या प्रारूप मतदार यादीत नाहीत अशा लोकांचे एक गठ्ठ्याने अर्ज आणून देऊ नये,तसे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याबाबत काळजी घ्यावी,असेही त्यांनी सुचित केले.




      
विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचा मतदारांना मतदान यादीतून वगळणे हा हेतू नसून मतदार याद्यांचे शुद्धीकरण करणे हा हेतू आहे. त्यामुळे एकही पात्र मतदार यादीतून वगळला जाणार नाही या दृष्टीने सर्व मतदान नोंदणी अधिकारी तसेच बीएलओ काम करत आहेत. तसेच या अनुषंगाने दावे व हरकती दाखल करताना सोबत पुरावे ही सादर करावेत, असेही श्रीमती तेली उगले यांनी सांगितले.  मतदार यादी निरीक्षक म्हणून भारत निवडणूक आयोगाने आपली नियुक्ती केली असून सोलापूर जिल्ह्यात या अंतर्गत तीन वेळा भेट दिली जाणार असून राजकीय पक्षांनी त्यांच्या काही समस्या अडचणी असतील तर त्या वेळोवेळी मांडाव्यात,असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
    
प्रारंभी जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी जिल्हा प्रशासनाने एसआयरअंतर्गत केलेल्या कामकाजाची माहिती दिली.जिल्ह्यात 17 जून 2026 रोजी एकूण मतदार संख्या 39,41,095 इतकी होती. विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत मतदारांची संख्या 33,18,424 इतकी झाली आहे. या प्रारूप यादीसोबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या ASDD यादीत 6,22,671 मतदारांचा समावेश आहे. अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच  जिल्ह्यात यापूर्वी 3,723 मतदान केंद्रे होती. त्यामध्ये 17 नवीन मतदान केंद्रांची वाढ झाली असून, आता जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्रांची संख्या 3,740 झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

राजकीय पक्षांच्या सूचना,प्रश्न - बैठकीत उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मतदार यादीत अनुपस्थित अथवा स्थलांतरित झालेल्या मतदारांना पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्याची कार्यवाही कशी करणार, तसेच एकाच कुटुंबातील सदस्यांचे मतदान एकाच मतदान केंद्रावर राहावे, मतदार यादी अचूक कराव्यात,पात्र मतदार वगळले जाणार नाहीत या दृष्टीने प्रशासनाने सजग राहावे. तसेच मतदार यादी शुद्धीकरणासाठी प्रशासनाला राजकीय पक्षांनी तसेच प्रत्येक पक्षाच्या बुथ लेवल असिस्टंट यांनी सहकार्य केले असून ते तसेच पुढेही करतील असे सांगितले.

SIR कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक - जिल्ह्यातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमासाठी सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत गृहभेटी 30 जून ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत घेण्यात आल्या. मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना 24 ऑगस्ट 2026 रोजी करण्यात आली. प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून,दावे व हरकती दाखल करण्यासाठी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर 29 ऑक्टोबर 2026 पर्यंत सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून,अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध होणार आहे.



एसआयआरच्या कामासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘टीम’ म्हणून काम करावे

प्रत्येक पात्र मतदाराचे नाव अंतिम यादीत आलेच पाहिजे; ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी - मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले

सोलापूर : विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) अंतर्गत मतदार यादीचे काम करताना सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून एक टीम म्हणून काम करावे. मतदार हाच केंद्रबिंदू असून प्रत्येक पात्र मतदाराचे नाव अंतिम मतदार यादीत समाविष्ट होईल, याची दक्षता घ्यावी. आगामी ४ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असल्याने प्रत्येक टप्प्याचे काटेकोर नियोजन करून विहित मुदतीत काम पूर्ण करावे, अशा सूचना मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिल्या.
     
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात एसआयआर अंतर्गत सर्व मतदान नोंदणी अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली, त्याप्रसंगी तेली उगले मार्गदर्शन करत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन, अप्पर आयुक्त
तुषार ठोंबरे,निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी लक्ष्मण कसेकर, मतदार नोंदणी अधिकारी सुमित शिंदे, अमित माळी, सीमा होळकर, अंजली मरोड, जयश्री आव्हाड, सदाशिव पडदुने, सचिन इथापे, सुशांत बनसोडे, अमोल सिंह भोसले, उपस्थित होते.
     
मतदार यादी निरीक्षक तेली पुढे म्हणाल्या की, एसआयआरच्या प्रत्येक टप्प्याबाबत अधिकाऱ्यांनी सखोल अभ्यास करून काम करण्याची आवश्यकता आहे. अधिकाऱ्यांनी परस्परांमध्ये नियमित संवाद ठेवावा. एसआयआर अंतर्गत एखाद्या विषयाची माहिती नसेल तर त्याबाबत योग्य माहिती घेऊनच पुढील कार्यवाही करावी. अपुरी अथवा चुकीची माहिती देणे टाळावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

दावे-हरकतींच्या सुनावणीचे योग्य नियोजन करा प्रारूप मतदार यादीवर प्राप्त होणाऱ्या दावे व हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी स्वतंत्र आणि नियोजनबद्ध वेळापत्रक तयार करावे. संबंधितांना सुनावणीच्या नोटिसा बजावताना उपलब्ध असलेल्या विविध माध्यमांचा प्रभावी वापर करावा. आवश्यकतेनुसार व्हॉट्सॲप संदेशाचाही वापर करून संबंधितांपर्यंत सूचना पोहोचवाव्यात,असे त्यांनी सांगितले.

सुनावणीच्या वेळी एखाद्या मतदाराच्या नागरिकत्वाबाबत शंका निर्माण झाल्यास संबंधित कागदपत्रांची योग्य प्रकारे तपासणी करावी. मतदार यादीतील माहितीच्या अचूकतेबरोबरच प्रक्रियेची पारदर्शकता कायम ठेवावी. ईआरओ डॅशबोर्डवरील माहिती सुरक्षित ठेवण्याची विशेष दक्षता घ्यावी,अशा सूचनाही त्यांनी दिल्या.





फॉर्म ७ व ८ च्या गैरवापरास प्रतिबंध करा - मतदार यादीत बदल अथवा नाव वगळण्याच्या प्रक्रियेत नियमांचे काटेकोर पालन करावे. बल्कमध्ये अर्ज स्वीकारू नयेत. फॉर्म क्रमांक ७ व ८ चा गैरवापर होणार नाही,यासाठी विशेष दक्षता घ्यावी. मृत व्यक्तीचे नाव मतदार यादीतून वगळताना संबंधित मृत्यू प्रमाणपत्राची तपासणी करूनच आवश्यक ती कार्यवाही करावी,असे तेली-उगले यांनी स्पष्ट केले.


तसेच, प्रत्येक मतदार नोंदणी अधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रातील व्हीआयपी मतदारांची यादी स्वतः तपासावी, अशी सूचनाही त्यांनी केली. एसआयआर अंतर्गत कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची तातडीने स्थापना करावी,असे निर्देशही मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले यांनी दिले.

अंतिम मतदार यादी अचूक,पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. विहित कालावधीत प्रत्येक प्रक्रिया पूर्ण करण्यासोबतच पात्र मतदारांचा मताधिकार अबाधित राहील, याची विशेष दक्षता घ्यावी,असे त्यांनी यावेळी सांगितले.





महाविद्यालयांत जाऊन नवमतदारांची नोंदणी करा - नवीन मतदार नोंदणीसाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. १८ ते १९ वर्षे वयोगटातील नवमतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी महाविद्यालयांना भेटी देऊन पात्र विद्यार्थ्यांची मतदार म्हणून नोंदणी करावी. पात्र असूनही एकही नागरिक मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही,यासाठी स्थानिक पातळीवर नियोजन करून विशेष जनजागृती उपक्रम राबवावेत,असे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन यांनी जिल्हा प्रशासनाने एसआयआर अंतर्गत केलेल्या कामकाजाची सविस्तर माहिती बैठकीत सादर केली. तसेच अप्पर आयुक्त तुषार ठोंबरे यांनीही मार्गदर्शन केले.