सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिव डॉ.माधवी खोडे-चवरे यांनी मंगळवारी (दिनांक 22) सोलापूर उर्दू घर व ग्रंथालयास सदिच्छा भेट देऊन तेथील विविध सुविधांची व उपक्रमांची पाहणी केली.
यावेळी त्यांनी उर्दू घरातील ग्रंथालय,कार्यालयीन परिसर तसेच सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. सांस्कृतिक समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘गैर-उर्दू व्यक्तींसाठी उर्दू शिकविण्याचे वर्ग’ आणि ‘सोलापूर उर्दू घर दर्शन’ या उपक्रमांचीही त्यांनी माहिती घेतली.
उर्दू भाषा व संस्कृतीच्या संवर्धनाच्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेऊन डॉ.खोडे-चवरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. उर्दू घराच्या सुविधा व उपक्रमांच्या अनुषंगाने आवश्यक बाबींचा आढावाही त्यांनी घेतला.
यावेळी तहसीलदार निलेश पाटील,सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी संग्राम पवार,नितीन धनाते,मनोज काळे,लोकेश गुल्लापल्ली,साहीर नदाफ,सुहेल युसूफ शेख तसेच सांस्कृतिक समितीचे सदस्य डॉ.शफी चौबदार,डॉ.हारून रशीद बागवान,महेमूद नवाज,सुमय्या बागवान,मोहम्मद अयाज,सफराज बालुलखान आदी उपस्थित होते.
उर्दू घर व ग्रंथालयातील उपलब्ध सुविधा आणि उपक्रमांचा लाभ नागरिक,विद्यार्थी व वाचकांनी घ्यावा,यासाठी आवश्यक प्रसिद्धी करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
