Ticker

6/recent/ticker-posts

सोलापुरात दरोड्याच्या तयारीतील सात सराईत गुन्हेगार जेरबंद; पिस्तूल,जिवंत राऊंडसह 10.29 लाखांचा मुद्देमाल जप्त

गुन्हे शाखेची मोठी कारवाई; XUV 500 आणि मोटारसायकलसह तलवारी,खंजीर,कटावणी,दोरखंड व इतर साहित्य ताब्यात

सोलापूर : सोलापूर शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सात संशयितांना शहर गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे पिस्तूल,पाच जिवंत राऊंड,दोन तलवारी,तीन खंजीर,दोन कटावणी,एक छन्नी,लांब दोरखंड,तीन जोड हॅन्डग्लोज,दोन नंबर प्लेट,कलर स्प्रे बॉटल,सात मोबाईल, महिंद्रा XUV 500 व यामाहा मोटारसायकल असा एकूण 10 लाख 29 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने ही कारवाई 20 सप्टेंबर 2026 रोजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत केली.



गोपनीय माहितीवरून पोलिसांचा सापळा - मालाविषयक गुन्ह्यांना प्रतिबंध करणे आणि दाखल गुन्ह्यांचा तपास करण्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलीस अंमलदार अमोल यादव यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, काही इसम सोलापूर शहरात दरोडा घालण्याच्या तयारीत असून ते प्लॉट नं. 83,अमर ज्योती नगर, नरसिंग नगरजवळ,मुळेगाव रोड,सोलापूर येथे जमले आहेत.

त्यांच्याकडे घातक शस्त्रे, काळ्या रंगाचे चारचाकी वाहन आणि मोटारसायकल असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी नमूद ठिकाणी जाऊन पाहणी केली असता काळ्या रंगाची चारचाकी आणि मोटारसायकलजवळ सात इसम संशयास्पदरीत्या थांबलेले दिसून आले. पोलिसांनी सापळा रचून सातही इसमांना ताब्यात घेतले.



पिस्तूल आणि पाच जिवंत राऊंड जप्त - पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता अंकुर रामकुमार प्रतापसिंह याच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्तूल आणि पाच जिवंत राऊंड मिळून आले. त्यानंतर महिंद्रा XUV 500 (MH 12 HB 7700) या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये तलवारी,खंजीर,कटावणी,छन्नी,दोरखंड,हॅन्डग्लोज,नंबर प्लेट, कलर स्प्रे बॉटल आणि मोबाईल असा मुद्देमाल आढळून आला.

पोलिसांच्या चौकशीत संशयितांकडून सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे मिळाली. अधिक चौकशी केल्यानंतर राजेश कन्नीराम राठोड याने पोलिसांना दरोडा टाकण्यासाठी पूर्वतयारी केल्याचे सांगितल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद आहे.



सात आरोपींवर गुन्हा दाखल - या प्रकरणी पोलीस शिपाई अमोल यादव यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे गु.र.नं. 847/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 310(4),भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 4/25 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 37(1)(2), 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सातही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अटक आरोपींची नावे
मनदीपसिंग दयासिंग संधू (43) – नांदेड
बलप्रीतसिंग सतनामसिंग खैरा (25) – नांदेड
अंकुर रामकुमार प्रतापसिंह (28) – जि. पटना, बिहार
लक्ष्मण नामदेव जगताप (35) – औरंगाबाद
सुखदेवसिंग बलविंदरसिंग गिल (42) – पंजाब
दिलीपसिंग हरीसिंग पवार खालसा (34) – नांदेड
राजेश कन्नीराम राठोड (44) – नरसिंग नगर,मुळेगाव रोड, सोलापूर. आरोपींवर यापूर्वी खून,खुनाचा प्रयत्न,दरोडा, घरफोडी,जबरी चोरी आणि हत्यार कायदा यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई - ही कारवाई पोलीस आयुक्त एम.राजकुमार आणि पोलीस उपआयुक्त (गुन्हे/विशेष शाखा) डॉ.अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस आयुक्त दिलीप पवार,वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने,सहायक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव,निलेश सोनवणे,पोलीस उपनिरीक्षक विजय बनसुडे,मनोज मोरे तसेच गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदारांच्या पथकाने केली.

पोलिसांच्या या कारवाईमुळे दरोड्याचा संभाव्य प्रकार रोखण्यात आल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाणे व गुन्हे शाखेकडून सुरू आहे.