पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश; जलद सुनावणीच्या घटनात्मक अधिकाराचा मुद्दा ठरला महत्त्वाचा
पंढरपूर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून केल्याच्या आरोपाखाली मागील पाच वर्षांहून अधिक काळ कारागृहात असलेल्या आरोपी संजय दगडू खरात (वय ३४, रा.धर्मगाव,ता.मंगळवेढा,जि.सोलापूर) यास पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एच.एल.मनवर यांनी २२ सप्टेंबर २०२६ रोजी हा आदेश दिला.
मंगळवेढा पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ४६०/२०२१ अंतर्गत आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता, १८६० मधील कलम ३०२, ३२३, ५०४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीला २० जुलै २०२१ रोजी अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा सत्र खटला क्र. ९३/२०२१ असा आहे.
पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याचा आरोप - फिर्यादीच्या जबाबानुसार,आरोपीला त्याची पत्नी पूनम हिच्या चारित्र्याबाबत तसेच तिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे तसेच पत्नीला मारहाण,शिवीगाळ व धमकी दिल्याचे आरोप करण्यात आले होते.
१६ जुलै २०२१ रोजी आरोपी मयत पत्नी व मुलांसह सासरवाडीतून घरी परतत असताना भालदार यांच्या शेताजवळ आरोपीने पत्नीला झाडाच्या आड नेऊन तिचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपी मुलांना घेऊन तेथून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद असल्याचे सांगण्यात आले आहे.
पाच वर्षांहून अधिक काळ कारागृहात; सुनावणीला विलंबाचा मुद्दा - आरोपीच्या जामीन अर्जावर त्यांच्यावतीने ॲड.शिवरत्न वाघ यांनी युक्तिवाद केला. आरोपी २० जुलै २०२१ पासून न्यायालयीन कोठडीत असून पाच वर्षे दोन महिन्यांहून अधिक काळ कारागृहात आहे,असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
इतका प्रदीर्घ कालावधी कारागृहात व्यतीत करूनही खटल्याची सुनावणी अपेक्षित गतीने पुढे गेलेली नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. तसेच आरोपीच्या जलद सुनावणीच्या घटनात्मक अधिकारावर परिणाम होत असून, पाच वर्षांहून अधिक काळ कारागृहात असतानाही सरकार पक्षाला अद्याप एकाही साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यासाठी उपस्थिती सुनिश्चित करता आलेली नाही,असा मुद्दा बचाव पक्षाने मांडला.
खटल्यातील विलंबाचा फटका आरोपीला अनिश्चित काळासाठी कारावासाच्या स्वरूपात बसू नये,अशी मागणी आरोपीच्या वतीने करण्यात आली.
न्यायालयाकडून जामीन मंजूर - बचाव पक्षाचा युक्तिवाद आणि प्रकरणातील परिस्थितीचा विचार करून पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एल.मनवर यांनी २२ सप्टेंबर २०२६ रोजी आरोपी संजय दगडू खरात यास सत्र खटला क्र. ९३/२०२१ मध्ये जामीन मंजूर केला.
या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. कदीर औटी,ॲड.वैभव बोंगे,ॲड.ओंकार फडतरे,ॲड.शिवरत्न वाघ,ॲड.मोहीम पठाण,ॲड.मनिष बाबरे,ॲड.रोहित थोरात,ॲड.अजय वाघमारे,ॲड.त्वरिता वाघ,ॲड.भाग्यश्री जगदाळे,ॲड.पैगंबर सय्यद,ॲड.सलामत पटेल,ॲड.संकेत पवार आणि ॲड.प्रदिप गायकवाड यांनी काम पाहिले. सरकार पक्षातर्फे ॲड.रामपुरे यांनी बाजू मांडली.
