सोलापूर : तरूणाईत मेफेड्रान या अंमली पदार्थ बाळगण्याचं प्रमाण अलिकडं वाढत असल्याचं पोलिसांच्या कारवाईनं पुन्हा एकदा समोर आलं आहे. येथील रेल्वे स्टेशन परिसरात परिसरात गेल्या बुधवारी ताब्यात घेतलेल्या तरूणाच्या ताब्यातून 56.940 ग्रॅम मेफेड्रान सह ₹1.86 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात अनेक लहान-मोठ्या मित्रांची रातोरात चौकशी झाल्याचंही बोललं जातंय.
सोलापूर शहराच्या आसपास ग्रामीण हद्दीत कच्च्या-पक्क्या मेफेड्रॉन प्रकरणात अधून-मधून कारवाया सुरु असतात. 18 सप्टेंबर रोजी सोलापूर ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोहेल अमर मुलाणी (वय- 28 वर्षे) याला 63 ग्रॅम एमडी सह पकडले. त्याच्यावर कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून गजाआड केलं होतं.
त्याची पोलीस कोठडीची मुदत संपण्यापूर्वीच, बुधवारी, पोलीस आयुक्तालय हद्दीत सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुस्तफा पुत्र अल्तमश शेख (वय 31 वर्षे, रा.1527 तुळशी नगर,बिस्मिल्ला बेकरीजवळ,खाडिपार/खोपली, भिवंडी, जि. ठाणे) याला 56.940 ग्रॅम मेफेड्रान बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.
सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील पाण्याच्या टाकीजवळील पार्किंगमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईत 56.940 ग्रॅम मेफेड्रानसह अल्तमश शेख याला पकडण्यात आलं. या कारवाईत त्याच्या ताब्यातून रोख रक्कम आणि मोबाईलसह एकूण ₹1,86,520 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,23 सप्टेंबरच्या रात्री सुमारे 8.50 वाजता रेल्वे स्टेशन बाहेरील ब्रिजजवळील पाण्याच्या टाकीजवळील पार्किंग परिसरात ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणात आरोपी अल्तमश मुस्तफा शेख याच्या अंगझडतीत, ₹1,70,820 किंमतीचं 56.940 ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन), ₹700 रोख रक्कम आणि ₹15,000 किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण ₹1,86,520 रुपयांचा मुद्देमाल असल्याचं पंचनाम्यात उल्लेख असल्याचं पुढं आलंय.
तलावात जळ टाकला तर मासा गळाला लागतोच,तद्वत ग्रामीण पोलिसांनी एक मासा पकडल्यावर सदर बझार पोलिसांच्या हद्दीत एक मासा शहर पोलिसांच्या गळाला सापडला. या परजिल्ह्यातील आरोपीबरोबर अनेक तरुणांची रातोरात चौकशी झाली,मात्र त्यातून काही निष्पन्न झालं किंवा कसं याचं स्पष्टीकरण पुढं आल्याचं दिसत नाही.
सदर बाजार पोलीस ठाण्याकडं एन.डी.पी.एस.ॲक्ट कलम 8 (क), 22( क) प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीचं स्थानिकांशी असलेलं कनेक्शन (संपर्क) त्याच्या मोबाईलमधील कॉल लॉग वरुन पुढं येण्यास मोलाची मदत होऊ शकते,असं दिसतंय. तरूणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी या गुन्ह्याच्या तपासाचा भाग म्हणून तळापर्यंत हात पोहोचले तर बडे मासे हाती लागतात, हे आजवरच्या तपासाच्या अनुभवातून पुढं आलं आहे.
