शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक शुल्क अनुदान योजना लागू करण्याची मागणी
मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त घोषित तालुक्यांमध्ये शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण कुटुंबांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी शासनाने भरावी,अशी मागणी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे करण्यात आली आहे.
याबाबत सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी राज्यातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेती व ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. दुष्काळामुळे पाणीटंचाई,पीक उत्पादनातील घट आणि ग्रामीण कुटुंबांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे.
ग्रामीण भागात मागील काही वर्षांत इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढली असून,या शाळांमध्ये शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण कुटुंबातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र,सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत पालकांना शैक्षणिक शुल्क भरणे आर्थिकदृष्ट्या कठीण होत आहे.
त्यामुळे केवळ आर्थिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
१) शासनाकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या
दुष्काळग्रस्त घोषित तालुक्यांतील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची इंग्रजी माध्यमाच्या शाळांची शैक्षणिक फी शासनाने भरावी.
२) पात्र विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक शुल्क अनुदान योजना तातडीने लागू करावी.
३) विद्यार्थ्यांची फी संबंधित शाळांना शासनाकडून थेट अदा करण्याची व्यवस्था करावी.
४) आर्थिक अडचणीत असलेल्या पालकांवर शैक्षणिक शुल्क वसुलीसाठी अनावश्यक दबाव आणला जाणार नाही, याबाबत स्पष्ट सूचना द्याव्यात.
५) स्वयंअर्थसहाय्यित व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांचाही योजनेत समावेश करावा.
६) दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शैक्षणिक मदत पॅकेज जाहीर करावे.
‘दुष्काळाचा फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बसू नये’ या भूमिकेतून शासनाने तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आर्थिक अडचणीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, यासाठी शासनाने विशेष उपाययोजना कराव्यात,अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी गणेश नीळ मेस्टा,राज्य सचिव यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केली आहे.
