2017 पासून सातत्याने पाठपुरावा; निधी,कामातील अडथळे आणि विलंबावर आक्रमक भूमिका घेत अखेर कामाला मिळाली गती
सोलापूर : न्यू बुधवार पेठ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या सुशोभीकरणासह त्यागमूर्ती माता रमाई यांच्या पुतळ्याची स्थापना करण्यासाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने 2017 पासून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. विविध निवेदने,स्मरणपत्रे,बैठका आणि आक्रमक आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अखेर माता रमाई यांचा पुतळा पुणे येथील मूर्तिकाराकडून तयार करून सोलापूरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात दाखल झाला आहे.
2017 साली बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे सुशोभीकरण तसेच त्यागमूर्ती माता रमाई यांचा पुतळा बसविण्याची मागणी महानगरपालिकेच्या सभागृहात करण्यात आली होती. त्यानंतर 2019 साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे सुशोभीकरण आणि माता रमाई यांच्या पुतळ्याच्या स्थापनेस सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
मात्र,उद्यानात डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचे पुतळे स्वतंत्र चबुतऱ्यांवर बसविण्याचे नियोजन असल्याचे समोर आल्यानंतर बहुजन समाज पार्टीने त्यासंदर्भात भूमिका घेतली. दोन्ही पुतळे स्वतंत्र ठिकाणी न बसवता एकाच चबुतऱ्यावर बसविण्यात यावेत,अशी मागणी पक्षाच्या वतीने 10 डिसेंबर 2019 रोजी सोलापूर महानगरपालिकेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
यानंतर कामाला शासनाची मान्यता मिळूनही बराच कालावधी उलटून कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याने 10 डिसेंबर 2020 रोजी पुन्हा स्मरणपत्र देण्यात आले. पुढे अण्णाभाऊ साठे दलित वस्ती नगरोत्सव योजनेअंतर्गत सन 2021-22 मध्ये या कामासाठी 1 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. महानगरपालिकेने उद्यान सुशोभीकरणाचा अंदाज तयार करून निविदा प्रक्रिया राबवली आणि जुलै 2022 मध्ये संबंधित मक्तेदाराला कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली.
मात्र,काम सुरू झाल्यानंतर केवळ चबुतऱ्याच्या कामावर मोठ्या प्रमाणात खर्च झाल्याचे सांगण्यात आले. संबंधित ठेकेदाराकडून पुढील कामासाठी निधी अपुरा असल्याचे कारण देण्यात आल्यानंतर काम पुन्हा रखडले.
या प्रकाराची गंभीर दखल घेत बहुजन समाज पार्टीच्या वतीने 30 जानेवारी 2025 रोजी सोलापूर महानगरपालिकेला निवेदन देण्यात आले. आतापर्यंत झालेल्या कामाचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात यावे, पुढील काम कधी आणि कोणत्या पद्धतीने पूर्ण करण्यात येणार आहे,याची सविस्तर माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन देण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
यानंतर बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने महानगरपालिकेत बैठका घेत कामाचा पाठपुरावा केला. तसेच पुणे येथे जाऊन मूर्तिकाराशी संपर्क साधत माता रमाईंचा पुतळा तयार करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
अखेर दीर्घकाळाच्या पाठपुराव्यानंतर माता रमाई यांचा पुतळा न्यू बुधवार पेठ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात दाखल झाला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या विषयाला आता प्रत्यक्ष स्वरूप मिळाले असून, उर्वरित सुशोभीकरणाचे काम आणि पुतळा स्थापनेची पुढील प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
“सातत्यपूर्ण पाठपुरावा,बैठका आणि आक्रमक भूमिकेमुळे रखडलेले काम पुन्हा मार्गी लागले असून माता रमाईंचा पुतळा अखेर उद्यानात दाखल झाला आहे,” अशी भूमिका बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
